बाजारात खरेदीची लगबग : फळे-फुलांच्या मागणीत वाढ : तयार लाडू-फराळालाही मागणी
बेळगाव : नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: पूजेचे साहित्य व फळे-फुले यांना मागणी वाढली होती. नागपंचमीसाठी गूळ, पोहे, खोबरे, फुटाणे, शेव, लाह्या आदींची खरेदी झाली. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने खरेदीला उधाण आले होते. त्यामुळे बाजारपेठ बहरताना दिसत आहे. पांगुळ गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक यासह इतर ठिकाणी खरेदीची वर्दळ पाहायला मिळाली. रविवार पेठ येथील किरकोळ पोहे-चुरमुरे दुकानात गर्दी झाली होती. त्याबरोबरच तयार लाडू आणि फराळाला मागणी वाढली होती. महिलांची सौंदर्यप्रसाधने आणि इतर खरेदी झाली. श्रावण महिन्यातील पहिल्याच सणासाठी बाजारपेठेत खरेदी-विक्रीमुळे उलाढाल वाढली होती. 17 ऑगस्टपासून निजश्रावण मासाला प्रारंभ झाला असला तरी सोमवारी पहिला श्रावण सोमवार असल्याने उपवासाच्या पदार्थांना पसंती दिली जात होती. साबू चिवडा, साबू, वरी, राजगिरा लाडू यासह फळांची मागणी वाढली होती. श्रावण महिन्यात पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी अधिक प्रमाणात केले जातात. त्यामुळे पूजेच्या साहित्याची रेलचेल सुरू झाली आहे. नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त किरकोळ बाजारात फळांची मागणी वाढली होती. केळी 60 ते 80 रुपये डझन, सीताफळ 160 रुपये किलो, सफरचंद 140 ते 280 रु. किलो, पेरू 100 रु. किलो, डाळिंब 100 ते 180 रु. किलो, पपई 50 ते 60 रु. नग, मोसंबी 60 ते 80 रु., ड्रॅगन फ्रूट 200 ते 250 रु. किलो, अननस 50 रु. नग असा फळांचा दर आहे.
नागमूर्तींची विक्री
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारात आकर्षक रंगीबेरंगी नागमूर्तींची विक्री झाली. शाडूच्या मूर्ती 20 ते 30 रुपये आणि रंगीत नागमूर्ती 50 ते 80 रुपये असा दर होता. रविवारी काहींनी नागमूर्ती घरी आणून पूजा केली. त्यामुळे मूर्तींची खरेदी वाढली होती. गणपत गल्ली, समादेवी गल्ली यासह इतर ठिकाणी नागमूर्तींची विक्री सुरू होती.









