वार्ताहर/नंदगड
येथील लक्ष्मीदेवीचा यात्रा उत्सव आठ दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. बुधवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारासाठी आलेले आसपासच्या गावांतील लोक व यात्रेसाठी आलेल्या भाविकांमुळे गावात एकच गर्दी झाली होती. खानापूर, बेळगाव, हल्याळ, बैलहोंगल तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने नंदगडमध्ये दाखल झाले होते. शिवाय पुणे, कोल्हापूर, गोवा येथूनही भाविक दाखल झाले आहेत. सकाळ-संध्याकाळ लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. पाळणे खेळण्यासाठी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी होताना दिसत आहे.
विद्युत दिव्यांची उत्तम सोय केल्याने रात्रंदिवस रस्त्यांवरून फिरताना लोकांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे सर्वच लोक यात्रेचा आनंद लुटताना दिसत आहेत. यात्रेच्या ठिकाणी रहदारीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून गावच्या वेशीतून चार चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नंदगड गावात जाण्यासाठी प्रवासी रिक्षांची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या ठिकाणी नंदगड पोलीस स्टेशनच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्री यात्रा स्थळाच्या बाजूला असलेल्या मंडपात मनोरंजनाखातर नाटक, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांनाही रसिकांची गर्दी दिसून येत आहे.









