ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिंडय़ादिंडय़ांतून घुमणारा विठुनामाचा गजर… अभंगांत दंगलेले वारकरी…अन् ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ…यामुळे अवघी पुण्यनगरी मंगळवारी भक्तिरसात चिंब झाली.

संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी शहरात आगमन झाले अन् ‘साधू संत येती घरा…तोची दिवाळी दसरा..’ अशा भावनेतून पुणेकरांनी आपली सेवा रुजू केली. सकाळपासूनच हजारो भाविकांची पावले दर्शनासाठी पालखी विठोबा मंदिर व निवडुंग्या विठोबा मंदिराच्या दिशेने वळली होती. लांबच लांब रांगा लावत व माउली-तुकोबांच्या पादुकांवर आपला माथा टेकवत पुणेकर भाविकांनी दर्शनाचा अमृतानुभव घेतला.

मुक्कामाचा दिवस म्हणजे थोडाफार निवांतपणा आलाच. अनेकांनी पुण्यातील शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग, पर्वती, कात्रज उद्यान यांसह विविध ठिकाणे, धार्मिक स्थळे यांना भेट देत मुक्कामाचा दिवस आनंदात घालवला. तर काहींनी खुल्या व्यायामशाळेकडे मोर्चा वळवत पायही मोकळे करून घेतले.

या निवांतपणाबरोबरच वारकरी बांधवांनी भक्तीचा जागरही घडविला. भजन, कीर्तनात, भक्तिरसात पुण्यनगरी न्हाऊन गेली. अवघा आसमंत पांडुरंगमय झाला. पुण्यातील नागरिकांनी या सोहळय़ाचे मनोभावे आदरातिथ्य केले. पुण्यात वारकऱ्यांना ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले. तसेच विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या.









