शेवंती, गुलाब, कमळ, झेंडू, बटण गुलाब, केवडा, जर्बेरा, निशिगंध फुलांची आवक : दिवाळीपर्यंत दर चढेच राहण्याचा अंदाज
बेळगाव : श्रावणात प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीचे व्रत आचरण्यात येते. या दिवशी घरोघरी महालक्ष्मी मूर्तीची सालकृंत पूजा करण्यात येते. अर्थातच बाजारपेठेत फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी शेवंती, गुलाब, कमळ, झेंडू, बटण गुलाब, केवडा, जर्बेरा, निशिगंध ही फुले मोठ्या प्रमाणात अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारामध्ये दाखल झाली होती. मुख्य बाजारपेठेपेक्षा काही प्रमाणात कमी दराने होलसेल मार्केटमध्ये फुले मिळत असल्याने पहाटेपासूनच फूल बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याने फुलांच्या बरोबरच हा परिसर ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मागणी वाढल्याने दरांमध्ये मात्र वाढ झाली. शेवंतीच्या फुलांचा दर 200 ते 300 रु. किलो, झेंडू 50 रु. किलो, बटण गुलाब 200 रु. किलो, कमळ 15 रुपयांना एक, केवडा 100 ते 150 रु. असे दर होते. अर्थात पूजेसाठी फुलांची सजावट हा महिलांच्या हौसेचा भाग असल्याने खरेदी तेजीने झाली. याशिवाय गजरा 100 रुपये वार आणि 30 रुपये हात अशा दराने विक्री झाली. याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेसह अनगोळ, वडगाव, शहापूर, टिळकवाडी व उपनगरांमध्ये फुले, श्रीफळ व पूजेच्या साहित्याचे स्टॉल ठिकठिकाणी मांडलेले दिसून आले. लक्ष्मी उभी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु तिची सजावट ही सर्वत्रच केली जाते. श्रावणात वाढलेले फुलांचे दर आता दिवाळीपर्यंत चढेच राहतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. बेळगावला प्रामुख्याने बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, दावणगिरी येथून फुलांची आवक होते. याचबरोबर केळीचे मोने, विड्याची पाने व सजावटीचे अन्य साहित्य यांचीही खरेदी तेजीने झाली.









