नवरात्र उत्सव : फळे-फुले अन् पूजा साहित्याला मागणी : उत्सव काळात दुर्गामातेचा जागर
बेळगाव : नवरात्र उत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात विविध पूजेच्या साहित्याबरोबर फळा-फुलांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे खरेदीसाठी रविवारी नागरिकांची गर्दी झाली होती. नवरात्र उत्सवात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे पूजेच्या साहित्याला अधिक पसंती मिळू लागली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने आबालवृद्धांसह नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. हार, फुले, फळे आणि पूजेच्या साहित्याची खरेदी अधिक प्रमाणात झाली. त्याबरोबरच देवीच्या आराशीसाठी झेंडू, शेवंती आणि इतर फुलांची रेलचेल पाहावयास मिळाली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तूंच्या खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे ज्वेलरी शोरुम, नवीन वाहने आदी ठिकाणी वर्दळ वाढलेली पाहावयास मिळत आहे. शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस आदी ठिकाणी खरेदी सुरू होती.
नवरात्र उत्सव काळात दुर्गामातेचा जागर होणार आहे. यासाठी दुर्गामाता मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच घरगुती पूजन केले जात आहे. त्यामुळे बाजारात सफरचंद, पेरू, डाळींब, सीताफळ, केळी आदी फळांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे फळांच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. शहरातील बसवाण गल्ली श्री कालिकादेवी, श्री महालक्ष्मी मंदिर, किल्ला येथील दुर्गामाता मंदिर, कॅम्प तेलगू कॉलनी येथील दुर्गामाता मंदिर आदी ठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. नवरात्र उत्सवाबरोबरच दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पांढरा पोषाख, भगव्या टोप्या आणि रुद्राक्ष माळांना मागणी वाढली आहे. विशेषत: दौडमध्ये सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींकडून खरेदी होत आहे. त्याबरोबरच रास गरबा, दांडियांनाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात टिपऱ्या आणि आकर्षक साहित्याची रेलचेल पाहावयास मिळत आहे.









