खानापूर : सर्वपित्री अमावस्यानिमित्त खानापूर येथील मलप्रभा नदीघाटावर रेणुका देवीच्या भक्तांसह भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अमावास्येनिमित्त मलप्रभा स्नानाला मोठे महत्त्व आहे. तसेच मलप्रभा नदीचे महात्म्य पुरातनकाळापासून असल्याने बेळगावसह आसपासच्या परिसरातून सर्वपित्री आमावस्येला पालख्या आणि रेणुका देवीच्या भक्तांची मांदियाळी असते. ‘उदो ग आई उदो’च्या गजरात रेणुका देवीचा गजर दुमदुमत होता. महालय पक्ष संपल्यानंतर मलप्रभा नदीतिरावर रेणुका देवीचे भक्त स्नान, पूजा करून स्वयंपाक करून जेवण करण्याची पूर्वपार प्रथा आहे. यासाठी मलप्रभा नदीवर भाविकांनी आपली परंपरा जपत अमावस्या साजरी केली. संपूर्ण मलप्रभा नदी परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. मलप्रभा नदी परिसरात पूजा सामान तसेच इतर दुकाने लावण्यात आली होती.
सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. तालुक्यात पक्ष पंधरवड्यात रेणुका देवीच्या महिला भक्तांनी देवीचा जोगवा मागण्याची परंपरा आहे. त्यानंतर सर्वपित्री अमावस्येला मलप्रभा नदीतिरी स्नान करून रेणुकादेवीची पूजा करून गोड नैवेद्य करून पडल्या भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार रविवारी सकाळपासून मलप्रभा नदीघाटावर खानापूर, बेळगाव भागातून अनेक रेणुका भक्त तसेच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच शिवाच्या भक्तांचीही मोठी गर्दी झाली होती. काही गावातून महादेवाच्या पालख्या मलप्रभा नदीतिरावर आणण्यात आल्या होत्या. पालखी धुवून देवाला स्नान घालून पूजा करण्यात आली होती. यात बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर, पिरनवाडी, अनगोळ यासह इतर परिसरातील पालख्याही आल्या होत्या. पूजा करून पुन्हा सायंकाळी प्रस्थान करण्यात आले.









