प्रतापगड :
१५ ऑगस्टच्या सुट्टीमुळे महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांचा ओसंडून वाहणारा उत्साह दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे येथील निसर्ग अधिकच मनमोहक बनला आहे. हिरवीगार डोंगररांगा, धबधब्यांचे सौंदर्य आणि आल्हाददायक हवा यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी आणि आजूबाजूच्या परिसरात दाखल झाले आहेत.
हलक्या सरींमुळे महाबळेश्वरमधील डोंगररांगांनी पाचूसारखी हिरवी शाल पांघरली आहे. सर्वत्र गच्च हिरवळ आणि धुक्यामुळे येथील वातावरण अधिकच आल्हाददायक झाले आहे. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या निसर्गाच्या रुपाने पर्यटक मंत्रमुग्ध झाले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत अनेक पर्यटकांनी महाबळेश्वरला पसंती दिली आहे. वेण्णा लेक, ऑर्थर सीट, केट्स पॉईंट, लिंगमळा धबधबा आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक निसर्गरम्य ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली आहे. पर्यटक छत्री आणि रेनकोटचा वापर करत निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
पावसाळी पर्यटन हंगामाला या गर्दीमुळे चांगलीच चालना मिळाली आहे. शहरातील अनेक हॉटेल्स, लॉजेस आणि होमस्टे हाऊसफुल्ल झाले आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्त्यांवर पर्यटकांची वाढती वर्दळ पाहता काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, पण पोलीस प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून ती सुरळीत केली.
पर्यटक येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवण्यासोबतच गरमागरम चहा, भजी आणि स्थानिक स्ट्रॉबेरी-क्रीमचा आस्वाद घेत आहेत. स्थानिक विक्रेते, छायाचित्रकार आणि पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसायांना या गर्दीमुळे मोठा आर्थिक फायदा झाला आहे. महाबळेश्वरमधील या नयनरम्य वातावरणाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अधिकच संस्मरणीय बनला आहे, असे मत पर्यटक आणि स्थानिकांनी व्यक्त केले.








