जुन्या बसपासची मुदत संपली
बेळगाव : परिवहनकडून सवलतीच्या दरात बसपास वितरित केले जातात. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 10 जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. ती मुदत आता संपली आहे. त्यामुळे सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकातील बसपास विभागात अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मागील दोन वर्षांत कोरोना व इतर कारणांमुळे बसपास प्रक्रिया विस्कळीत झाली होती. यंदा बसपास प्रक्रियेला सुरळीत प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 2620 विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. दरवर्षी बेळगाव आगारातून 26 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र यंदा ही संख्या घटणार आहे. विद्यार्थिनींचा मोफत बसप्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे केवळ मुलेच बसपास घेणार आहेत. परिणामी बसपासच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील घटणार आहे. मागील दोन वर्षांत बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी ऑफलाईन बसपास वितरित केले जात होते. अर्ज देताच हातात बसपास उपलब्ध होत होता. त्यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरत होती. आता ऑनलाईन बसपास प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारने 11 जूनपासून महिलांना व विद्यार्थिनींना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे यंदा केवळ विद्यार्थीच (मुले) बसपास काढणार आहेत. परिणामी एकूण बसपासधारक विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. सध्या सुरू असलेल्या महिलांच्या मोफत बसप्रवासामुळे विद्यार्थीवर्गाची गैरसोय होऊ लागली आहे. बसफेऱ्या अनियमित झाल्याने विद्यार्थ्यांना दाटीवाटीने व लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन बसफेऱ्या वाढविणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत बसपास काढून घ्यावेत- ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)
विद्यार्थ्यांच्या बसपास प्रक्रियेचे काम सुरू आहे. सेवासिंधू पोर्टलवर अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रे बसपास विभागात स्वीकारली जात आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी करून बसपास वितरित केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत बसपास काढून घ्यावेत.









