आजपासून देणार अर्ज : महापौर
पणजी : राजधानी पणजीत हेणाऱ्या अष्टमीच्या फेरीतील स्टॉल्ससाठी काल सोमवारी अर्ज घेण्यासाठी दुकानदार, विक्रेत्यांनी पणजी महापालिकेकडे मोठी गर्दी केली. परंतु त्यांना अर्ज देण्यात आले नाहीत. अर्ज आज मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिली. काल सोमवारी अचानक पणजी मनपाकडे अर्जासाठी लोकांची गर्दी झाली. काहीजणांना फोनवरून अर्ज देणार असल्याचे सांगण्यात आले. त्याची बातमी विक्रेते, दुकानदार यांना कळताच त्यांची गर्दी वाढत गेली. त्यात परप्रांतीय तसेच महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते. अर्जासाठी त्यांनी गरज नसताना विनाकरण गर्दी केल्याचे दिसून आले. रविवारी सायंकाळपासून दाखल झालेल्या विक्रेत्यांनी मनपासमोरच रात्र घालविली. सोमवारी दिवसभरही ते तिथेच ठाण मांडून होते.
आता मंगळवारी म्हणजे आज पुन्हा एकदा अर्जासाठी गर्दी उसळणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्वावर अर्ज वितरित करण्यात येणार असल्याचे महापौर मोन्सेरात यांनी सांगितले आहे. दरवर्षी अष्टमीच्या फेरीला असेच सांगण्यात येते. परंतु ते अर्ज बाहेरच्या बाहेर विकतात. अशा भानगडी या आधी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे तासनतास रांगेत राहूनही अर्ज मिळत नाहीत. तसेच ते संपल्याचे आयत्यावेळी सांगण्यात येते आणि मग रांगेतील लोकांना हात हलवत माघारी फिरावे लागते, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येत आहे. पणजी मनपा आयुक्त व कर अधिकारी या अर्जवितरण प्रक्रियेवर देखरेख आणि लक्ष ठेवणार असून गडबड, गोंधळ होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले. दरम्यान स्थानिक गोमंतकीयांना अष्टमी फेरीत प्राधान्य मिळणार की नाही अशी शंका त्यांनीच उपस्थित केली आहे.









