सणासुदीच्या काळात अतिरिक्त रेल्वेची मागणी
बेळगाव : दसरा सुटी संपवून माघारी जाणाऱ्या प्रवाशांमुळे मंगळवारी रात्री बेळगाव रेल्वेस्थानकावर तुफान गर्दी झाली होती. मुंबई तसेच बेंगळूर या मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस प्रवाशांनी भरून धावत होत्या. डब्यांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होती. विशेषत: जनरल डब्यांमध्ये तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले. नवरात्रोत्सवात सरकारी शाळांना सुटी असताना बेंगळूर, म्हैसूर येथील अनेक जण गावी आले होते. तसेच यावर्षीचा दसरा रविवारच्या साप्ताहिक सुटीला जोडून आल्याने मुंबई, पुणे, हैदराबाद येथून नागरिक आपापल्या घरी आले होते. दसऱ्याचा आनंद लुटून सर्वजण मंगळवारी रात्री शहरांकडे परतले. परंतु, एकाचवेळी गर्दी झाल्याने रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत रेल्वेस्थानकावरील गर्दी कायम होती. रेल्वेचे बुकिंग नसल्याने अनेकांना जनरल डब्यातून प्रवास करावा लागला. परंतु, रेल्वे डब्यांमध्ये तुफान गर्दी असल्याने तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागला. मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस, बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस, हुबळी-मुंबई एक्स्प्रेस, म्हैसूर-मुंबई एक्स्प्रेस, वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांना गर्दी झाली होती. यामुळे किमान सण-उत्सवांच्या काळाततरी गर्दीच्या मार्गांवर अधिक गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात होती.









