विविध धार्मिक कार्यक्रम : प्रसादाचे वाटप, सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा
बेळगाव : श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सकाळपासूनच महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. बेळगावच्या दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये महिलांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरासह उपनगरांमध्ये महादेव मंदिरे गर्दीने फुलली होती. काही मंदिरांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरांमध्ये गर्दी होत असते. दुसऱ्या श्रावण सोमवारी बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरासह मिलिटरी महादेव, कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान यासह इतर शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटेपासून अभिषेक तसेच पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. कपिलेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने विसर्जन तलावावर मंडप घालून त्या ठिकाणाहून भाविक मंदिरामध्ये सोडले जात होते. पहाटेपासून मंदिरामध्ये अभिषेक सुरू होते. महादेवाला फुलांची सजावट करण्यात आली होती. विविध संस्थांकडून या ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा दिसून आल्या.
विशेष पूजेचे आयोजन
गणेशपूर येथील रुद्रकेसरी मठामध्ये श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. उज्जैन येथील महाकालच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. परमपूज्य हरिगुरु महाराज व त्यांच्या शिष्यांनी मठातील जगद्गुरु सिद्धारुढ महाराजांसमोरील शिवपिंडीला आकर्षकरीत्या सजविले. पूजा, अभिषेक, भस्मलेपन व भस्मारती करण्यात आली. महाकालचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती.









