महिला भाविकांच्या अलोट गर्दीत भव्य मिरवणूक : हलगा लक्ष्मी यात्रेत भंडाऱ्याची उधळण-देवीचा जयघोष
वार्ताहर/सांबरा
हलगा येथे मंगळवार. 18 पासून श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असून दुसऱ्या दिवशी बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीत ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बुधवारी लक्ष्मी गल्ली येथील नागरिकांना ओटी भरण्याचा मान होता. त्यानुसार भंडाऱ्याची उधळण करत व देवीचा जयजयकार करत गल्लीतील सर्व महिला, युवक व नागरिकांनी मिरवणुकीत भाग घेतला होता. मिरवणूक मंदिरकडे आली असता गल्लीच्या वतीने ओटी भरण्यात आली. ओटी भरून देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. ओटी भरण्यासाठी सर्व गल्लीतील नागरिकांना देवस्थान पंचकमिटी, यात्रोत्सव कमिटी व ग्रामपंचायतीने ठराविक दिवस ठरवून दिला आहे. त्यानुसार बुधवारी लक्ष्मी गल्लीतील नागरिकांचा मान होता.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजी चौक, सार्वजनिक गणेशोत्सव तऊण युवक मंडळ व शिवसेना शिवजयंती युवक मंडळ व गल्लीच्या वतीने श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली. दररोज सायंकाळी 5:30 च्या आत ओटी भरून घेण्यात यावी, असे कमिटीने आवाहन केले होते. त्यानुसार गल्लीतील नागरिकांकडून वेळेच्या आतच ओटी भरण्यात आली. त्यामुळे त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच इतर गल्लीतील नागरिकांनीही वेळेत ओटी भरून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान-यात्रोत्सव कमिटी व ग्रा.पं.ने केले आहे.
हलगा येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या ‘तरुण भारत’ यात्रा विशेषांकाचे प्रकाशन
हलगा येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या दै. ‘तरुण भारत’च्या वतीने काढण्यात आलेल्या यात्रा विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर विशेषांकामध्ये गावचा संपूर्ण इतिहास, यात्रेची माहिती व इतर सर्व माहिती सविस्तर मांडण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी देवस्थान पंचकमिटीचे चंदा देसाई, सदानंद बिळगोजी, मोन्नाप्पा घोरपडे, प्रकाश पाटील, उमेश कानोजी, माऊती कामानाचे, अर्जुन कानोजी, मनोहर संताजीसह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









