राजापूर :
अगणित शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरातील प्रसिद्ध श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्र यात्रोत्सव मोठ्या उत्साही व धार्मिक वातावरणामध्ये पार पडला. ओम नम: शिवाय.. हरहर महादेव.. अशा शिवनामाच्या जपामध्ये हजारो भाविकांनी बुधवारी श्रीदेव धूतपापेश्वरांच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरात झेंडूची फुलांची आकर्षक आरास आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्रौत्सवानिमित्त संस्थान श्रीदेव धूतपापेश्वर देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. उत्सव काळातील पारंपारिक वाद्य, नित्यपूजा, श्रींवर रूद्राभिषेक, महापूजा, महानैवेद्य, श्रींचा शयनकाल, श्रींना फलाहार अर्पण, मंत्रपुष्प, पुराण, गायन, कीर्तन, भोवती, आरती आदी कार्यक्रमांनी गेले तीन–चार दिवस संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला असताना बुधवारी महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी याठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला.
बुधवारी पहाटे नित्यपूजेने महाशिवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर श्रींवर रूद्राभिषेक, तसेच भजन, किर्तन आदी कार्यक्रम दिवसभरात पार पडले. यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी श्रीदेव धूतपापेश्वराचे दर्शन घेतले. ओम नम: शिवाय.. हरहर महादेव.. असा शिवनामाच्या जप शिवभक्तांच्या मुखातून केला जात होता. यामुळे परिसरातील वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. दरम्यान भाविकांना राजापूर शहरातून जाण्या–येण्यासाठी धूतपापेश्वर लिमीटेड पनवेल यांच्या वतीने मोफत मिनी बसची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच विविध संघटना आणि मंडळांच्या माध्यमातून प्रसाद वाटप, सरबत, खिचडी वाटप करण्यात आले.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त गाभाऱ्यात आकर्षक झेंडूच्या फुलांनी केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तर नवलादेवी मंदिर, तसेच गणपती मंदिरातही सजावट करण्यात आली होती. दरम्यान यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी न होता भाविकांचा प्रवास सुखकर झाला.








