वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
हर हर महादेव..च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवस्थान मंदिरमध्ये सोमवारी जवळजवळ 10 हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्ताने मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. श्रावण मासानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे तिसऱ्या सोमवारी महाप्रसाद वाटपाची ही परंपरा आजतागायत कायम आहे. यानिमित्ताने सोमवारी रात्री भजन व धार्मिक गीतांचे भजनी कार्यक्रम पार पडले. पहाटे सकाळी महाआरती म्हणण्यात आली. महाप्रसाद तयार झाल्यावर दुपारी 1.30 वा. श्री कलमेश्वर देवस्थानच्या पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी बसु पुजारी व कल्लाप्पा पुजारी यांच्या हस्ते महाप्रसादाचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर महाप्रसाद वाटपाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंचकमिटी, सदस्य श्री कलमेश्वर मंदिर सेवा समिती सदस्य, महिला मंडळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.









