सीपीएड मैदानावर आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
तीन हत्तींवर बसून सहाजण झांज वाजवत तुमचे स्वागत करतात. आत प्रवेश करताच पिसारा फुलवलेला मोर, बागडणारी हरणे, मुक्तविहार करणारे पोपट आणि वेगवेगळे पक्षी तुमचे लक्ष वेधून घेतात. हे सर्व पक्षी कृत्रिम असले तरी खरे वाटावेत इतके ते विलक्षण आहेत. या पक्ष्यांसह विविध खेळ बेळगावकरांचे मनोरंजन करण्याची प्रतीक्षा करत आहेत. बेळगावमधील सीपीएड ग्राऊंड मैदानावर फनफेअर फेस्टीव्हलमध्ये हे सर्व पहायला मिळेल.
या प्रदर्शनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. झोपाळे, विविध खेळ, जायंट व्हील, लहान मुलांसाठी मनोरंजन करणारे खेळ असे बरेच काही या फनफेअरमध्ये पहायला व अनुभवायला मिळते. या फनफेअरमध्ये पक्ष्यांचे रोबोटीक वर्ल्ड हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे. देश आणि विदेशातील प्राणी, पक्षी यांचा यामध्ये समावेश आहे. सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत फनफेअर फेस्टीव्हलचा आनंद लुटता येतो.
मागील दोन वर्षात कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध आले होते. आता पुन्हा एकदा सामान्य परिस्थिती झाल्यानंतर अनेक फेस्टीव्हल सुरू झाले आहेत. वृंदावन एक्झिबिशन आयोजित बेळगाव फनफेअर फेस्टिव्हल-2022 चे क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा विरंगुळा मिळावा यासाठी फनफेअरचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक खेळ, ब्रेक डान्स, ड्रगन टेन, सिसॉ, जायंट व्हील, झोपाळे, पाळणे, बंदुकीने नेम धरणे असे विविध गेम या ठिकाणी उपलब्ध आहेत.
केवळ खेळच नाही तर खाद्यपदार्थाचे स्टॉल लक्ष वेधून घेतात. पंजाबी छोले-भटुरे, गोबी मंचुरी, पकोडे, समोसे, वडापाव, फायर पान यासह लोणची, पापड, मिठाई या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांसोबतच कपडे, गृहोपयोगी वस्तू यांचेही स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आनंद लुटण्यासोबतच खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे. सध्या शाळा-कॉलेजना दसऱयाची सुट्टी असल्याने शेकडोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती दिसून येत आहे. शिवाय महिलांसाठी विविध दागिने, स्वयंपाकघरातील विविध उपकरणे, घरगुती वापराच्या वस्तू हे ही आकर्षण आहे.
रोबोटीक वर्ल्ड ठरतेय लक्षवेधी
बेळगाव फनफेअर फेस्टीव्हलमध्ये लहान मुलांना प्राण्यांची माहिती क्हावी यासाठी रोबोटीक वर्ल्ड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये देशासह परदेशातील अनेक प्राणी, पक्षी यांचा समावेश आहे. अस्वल, हत्ती, आदिवासी जीवन, पोपट, कोकीळा, पेंग्वीन, गायी, मोर, यासह इतर पक्षी, प्राणी हे आवाजासह प्रदर्शनात असल्यामुळे लहान मुलांसाठी ते आकर्षणीय ठरत आहे. प्राण्यांसोबत फोटो घेण्यासाठी गर्दी होत आहे.
भव्य प्रवेशद्वार
सीपीएड मैदानावर भव्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. सांबरा येथील सुवर्ण विधानसौधची प्रतिकृती असणारी छबी प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर 3 हत्ती स्वागतासाठी उभे आहेत. दाक्षिणात्य संगीतावर हे हत्ती सोंड हलवत असल्याने म्हैसूरमधील पारंपरिक दसऱयाची आठवण या ठिकाणी होत आहे.









