वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स त्याने स्वत: दिलेल्या कबुलीनुसार 50 षटकांच्या सामन्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात पुन्हा पडला आहे. परंतु क्रेकेट तज्ञ व विश्लेषकांना मात्र एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याविषयी अजूनही साशंकता वाटत आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांचे भवितव्य हा मुद्दा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे.
भारत हे जागतिक क्रिकेटचे केंद्र आहे आणि त्यामुळे 45 दिवस चाललेल्या विश्चषक स्पर्धेच्या वेळी प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा होती. भारतात झालेली विश्वचषक स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वाधिक उपस्थिती लाभलेली स्पर्धा ठरली असून ते आश्चर्यकारक नाही. विक्रमी प्रमाणात म्हणजे 1.25 दशलक्षाहून अधिक लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली. परंतु भारतासह जगात इतरत्र कुठेही जेव्हा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होईल, तेव्हा अशी धमाल आणि जल्लोष बहुदा दिसणार नाही.
खेळाडू आणि अनेक क्रिकेटप्रेमींना कसोटी क्रिकेट आवडते, तर टी20 हा असा प्रकार आहे जो सध्या प्रचंड लोकप्रियतेचा आनंद घेत आहे आणि खेळाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर केला जात आहे. सध्याच्या डिजिटल युगात लक्ष देण्याची वेळ नेहमीपेक्षा कमी झालेली आहे आणि प्रत्येकाकडे एकदिवसीय सामन्यासाठी आठ तास घालविण्याइतका वेळ आणि उत्साह नाही. भारतातील विश्वचषक स्पर्धेने हे दाखवून दिले आहे की, जर जागतिक स्पर्धा असेल, तर भरपूर लोक येतील. परंतु द्विपक्षीय एकदिवसीय सामने पुढे जाण्याच्या दृष्टीने असे चित्र दाखवत नाहीत.
त्यामुळे एकदिवसीय सामने केवळ विश्वचषक स्पर्धा होणार असलेल्या वर्षातच खेळवले जावेत का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसे करायचे नसल्यास वसिम अक्रम आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांनी दिलेले सल्ले मानून एकदिवसीय क्रिकेटच्या रचनेत बदल करायला हवेत. बहुतेक संघांचे आगामी वेळापत्रक पाहता त्यांचे प्राधान्य एकदिवसीय सामन्यांना नाही. पुढील वर्षी भारत फक्त सहा एकदिवसीय सामने खेळेल. पाकिस्तानमध्ये 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार असली, तरी नियोजन पाहता नोव्हेंबर, 2024 पर्यंत ते एकही एकदिवसीय सामना खेळणार नाहीत.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान अक्रमने असे मत व्यक्त केले होते की, एकदिवसीय सामन्यातील डाव 40 षटकांपर्यंत कमी केला जावा, तर साचिनच्या मते, एकसुरीपणा मोडून काढण्यासाठी एकदिवसीय सामन्यांची रचना प्रत्येकी 25 षटकांच्या चार डावांमध्ये करायला हवी. ‘आजकाल एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या 30 षटकांमध्ये काही तरी रंजक घडताना तुम्हाला फार क्वचितच दिसते. 40 व्या षटकांत पोहोचल्यानंतर तुम्हाला अॅक्शन दिसून येते. त्यामुळे मला वाटते की, 40 षटकांचा डाव, विशेषत: द्विपक्षीय मालिकेसाठी, अधिक रंजक ठरेल’, असे अक्रमने म्हटलेले आहे.









