रमजानसाठी मुस्लीम बांधवांकडूनही खरेदी, बाजारपेठेला बहर
बेळगाव : अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीला बहर आला होता. विशेषत: सोने खरेदी आणि इतर नवीन वस्तू पसंती व खरेदीला गर्दी झाली होती. दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने खरेदीसाठी वर्दळ पाहायला मिळाली. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे बाजारात सोने, चांदी, वाहने इतर वस्तूंच्या खरेदीला पसंती मिळाली. याबरोबरच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईददेखील शनिवारी असल्याने ड्रायफ्रूटसमध्ये खजूर, खारीक, बदाम, अक्रोड, अंजिर आदींची खरेदी वाढली होती. शाळांना सुटी असल्याने हिंदू आणि मुस्लीम बांधवांनी आपल्या कुटुंबासह खरेदीला पसंती दिली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शहरातील सराफ दुकानांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या सोन्याच्या दराचा चटका सहन करावा लागणार आहे. विशेषत: सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. त्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा सण सुरळीतपणे सुरू झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठ आणि व्यावसायिकदेखील पूर्वपदावर येऊ लागले आहेत. य् ाात्रा-जत्रा आणि लग्नसराईमुळे बाजारपेठ बहरू लागली आहे. त्यातच अक्षय्य तृतीया आणि रमजानमुळे भर पडू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे.









