सजावटीच्या साहित्याची खरेदी : नागरिकांची वर्दळ
बेळगाव : शेवटचा श्रावण सोमवार आणि गणेशोत्सव अगदी तोंडावर आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी रविवारी गर्दी उसळली होती. विशेषत: पूजेच्या साहित्याबरोबर फळे-फुले आणि इतर साहित्याला मागणी अधिक होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिकांची खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, मेणसी गल्ली, किर्लोस्कर रोड, शनिवार खूट, टिळक चौक, काकतीवेस रोड आदी ठिकाणी वर्दळ वाढली होती. जसजसा गणेशोत्सव जवळ येत आहे तसतशी गणेशोत्सवासाठी उत्कंठा वाढू लागली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दुकानेही फुलू लागली आहेत. त्याबरोबरच लायटिंग, प्लास्टिक माळा, सजावटीचे साहित्य, थर्माकोलचे मखर आदींची खरेदी होऊ लागली आहे.
आज शेवटचा श्रावण सोमवार
शहरात आज शेवटचा श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात विविध साहित्य आणि पूजेच्या साहित्याची मागणी वाढली होती. शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शिवाय विविध मंदिरांतून पूजा-अर्चा, अभिषेक आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. यासाठी रविवारी फळे-फुले इतर साहित्याची खरेदी झाली.









