भाजीपाल्यासह सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी मोठ्याप्रमाणात : महागाईचे सावट
खानापूर : तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या खानापूर शहरात रविवारी खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील लोक गणेशचतुर्थीच्या साहित्याच्या खरेदीसाठी आले होते. खानापूर आठवड्याचा रविवारी बाजार भरतो. गणपती सणाचा बाजार असल्याने बाजारात ग्रामीण भागातील लोकांची खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. शिवस्मारकापासून ज्ञानेश्वर मंदिर, बेंद्रे खुट ते पारिश्वाड रोड या ठिकाणी बाजार मोठ्याप्रमाणात भरला होता. भाजीपाल्यासह गणपतीला सजावटीच्या लागणाऱ्या वस्तूंची खरेदी मोठ्याप्रमाणात होताना दिसत होती. रेडीमेड कापड दुकानेही गर्दीने फूलून गेली होती. सोमवारी बाजारात गर्दी होणार असल्याने पोलिसांनी बाजारपेठेत शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी गणपतीला लागणाऱ्या माटोळीसह विविध साहित्य बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. जगंलातील विविध वनस्पती, वेली, फुले यासह इतर साहित्य तालुक्यातील ग्रामीण भागातून बेळगाव येथे विक्रीला जात असते. या माटोळीच्या साहित्याला बेळगावमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी आहे. ते साहित्य सोमवारी व मंगळवारी बाजारात विक्रीसाठी आणतात.
दुष्काळाचे सावट तरीही उत्साह
शिवस्मारक चौकापासून ज्ञानेश्वर चौकापर्यंत तसेच बाजारपेठ ते पारिश्वाड क्रॉस संपूर्ण बाजार गर्दीने फुलून गेला होता. महागाईचे तसेच दुष्काळाचे सावट असतानाही विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी फळे, सजावटीचे साहित्य, फटाके, कपडे, माटोळ्याचे साहित्य खरेदीसाठी लोकांची एकच झुबंड उडाली होती. सकाळी 9 वाजल्यापासूनच बाजारात खरेदीसाठी गर्दी सुरू झाली होती.
एक गाव एक गणपतीची परंपरा
तालुक्यात गावागावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही गावात पूर्वापार परंपरेनुसार ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा आहे. प्रत्येक घरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या स्वागतासाठी तसेच आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्याप्रमाणात खरेदी केली जाते. या उत्साही सणात सहभागी होण्यासाठी व्यवसाय व नोकरीनिमित्त परगावी असलेला कामगारवर्ग आपल्या गावी येऊन या सणात मोठ्या हिरीरीने भाग घेतात. यामुळे रविवारी परगावी येणाऱ्या चाकरमान्यांचीही मोठी गर्दी झाली होती. आपापल्या गावी जाण्यासाठी दुचाकी, बसेस, खासगी वाहने यांची बसस्थानकावर एकच गर्दी झाली होती.
हार-फुलांना मोठी मागणी
भर रस्त्यावर फळविक्रेते, भाजीविक्रेते, नारळ, माटोळी साहित्य, फुगे विक्रेते, यासह फूल, हार विक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्यामुळे बाजारात तुडुंब गर्दी झाली होती. हारांचे दरही विक्रेत्यांनी भरमसाट वाढवले आहेत. पावसामुळे फुले मिळत नसल्याने एरव्ही 5 ऊ. ला मिळणारा हार 25 ऊपये तर 10 ऊ. दराने मिळणारा हार 40 ऊ. ला विक्री केला जात होता. तर चांगल्या प्रतीचे हार 50 ते 100 ऊ. दराने विक्री केले जात होते.









