बॅग, कंपास, वह्या, पुस्तके, वॉटरबॅगच्या मागणीत वाढ
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने शालेय साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. शहरातील स्टेशनरी दुकानांमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी होऊ लागली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शालेय साहित्य खरेदीला विद्यार्थीवर्गाने पसंती दिली होती. शैक्षणिक साहित्याने स्टेशनरी दुकाने सजली असून साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग वाढली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 29 मेपासून प्रारंभ झाला आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमाला सुऊवात झाली आहे. त्यामुळे वह्या, पेन, कंपासपेट्या, बॅग, पुस्तके, वॉटरबॅग आदींच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: बॅग आणि स्टेशनरी दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्याची खरेदी वाढली आहे. त्याबरोबरच बाजारात रेडिमेड गणवेश उपलब्ध झाल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची खरेदी केली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. दरम्यान, शाळादेखील बराच काळ बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करावा लागला. त्या काळात शैक्षणिक साहित्याची खरेदी मंदावली होती. मात्र, आता शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शालेय साहित्याची खरेदी वाढली आहे. बाजारात किंगसाईज वही 50 ऊपये, कंपासपेटी 50 ते 100 ऊपये, बॅग 150 ते 500 ऊपये, वॉटरबॅग 70 ते 100 ऊपये असा दर आहे. त्याबरोबरच पुस्तकांच्या किमती इयत्तेनुसार आहेत. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाल्याने शालेय साहित्य खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबरोबरच पावसाळा तेंडावर आल्याने विद्यार्थ्यांसाठीचे रेनकोट, छत्री यांचीही विशेष विक्री सुरू झाली आहे.









