आठ कोटींची उलाढाल झाल्याची चर्चा : बकऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात
खानापूर : तालुक्यात गणेश चतुर्थीच्या उत्सवानिमित्त बाजारपेठा फुलल्या असून रविवारी बाजारात गर्दी दिसून येत होती. तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी ऋषीपंचमीनिमित्त तालुक्यात बकरी मारण्याची प्रथा (हुंदरुपी) असून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ही परंपरा पाळली जाते. यासाठी बुधवारी गणेश चतुर्थी आणि गुरुवारी आणि शुक्रवारी हुंदरुपी साजरी करण्यात येते. त्यामुळे आजचा रविवारच्या बकरी बाजारात मोठ्याप्रमाणात बकऱ्यांची विक्री झाली. दिवसभरात बकरी बाजारात अंदाजे 8 कोटीच्या वर उलाढाल झाल्याची चर्चा आहे.
खानापूर-बेळगाव रस्त्यावरील येथील मऱ्याम्मा मंदिरच्या समोरील मैदानात हा बकरी बाजार भरवण्यात येतो. बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने रविवारचा मुख्य बाजार असल्याने सकाळपासूनच बकरी बाजारात मोठ्याप्रमाणात बकऱ्यांची आवक झाली होती. सकाळी दहानंतर खरेदी विक्रीला सुरवात झाली. 11 ते दीड या वेळेत प्रचंडी गर्दी झाल्याने खानापूर-बेळगाव रस्त्यावर गर्दी झाल्याने रहदारी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहनाना वाट मोकळी करून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली. दुपारी 4 पर्यंत बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. बकऱ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास 8 कोटीच्या वर उलाढाल झाल्याची चर्चा बाजारातील जाणकारांकडून व्यक्त होत होती.
बाजारात बकऱ्यांच्या किमतीही वाढल्याचे व्यवहारातून दिसून येत होते. लहान बकरी 10 हजार तर मोठी बकरी 30 ते 35 हजारापर्यंत विक्री होत होती. बाजारात गर्दी पाहून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. जांबोटी क्रॉस ते हलकर्णीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा होत्या. त्यामुळे बेळगाव-खानापूर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. सकाळी 10 पासून सायंकाळी 6 पर्यंत या बकरी बाजारात व्यवहार होत होते. तालुक्यात गणपतीच्या दुसरे दिवशी बकरी मारण्याची प्रथा असून यावर्षी बुधवारी गणपती असल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी संपूर्ण तालुक्यात हुंदरी साजरी करण्यात येणार आहे. तसेच पाचव्या दिवशी ओवसेनिमित्त ग्रामीण भागात बकरी मारण्याची परंपरा आहे. यासाठी हा शेवटचा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी झाली होती. तसेच श्रावण संपल्याने येथील मासळी मार्केटही सुरू झाले आहे. रविवारी गोवा व कारवार येथून मोठ्या प्रमाणात मासळी दाखल झाली. मासळी बाजारातही रविवारी मोठी गर्दी दिसून येत होती.









