सर्व्हरडाऊनचा बसतोय फटका, आज अंतिम मुदत
बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीसाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. मात्र सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना ग्राम वन व कर्नाटक वनमध्ये ताटकळत थांबावे लागत आहे. शिवाय मुदतीच्या कालावधीत रेशनकार्ड दुरुस्त होणे अशक्य आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. शिवाय गृहलक्ष्मी योजनेंतर्गत रेशनकार्डवरील प्रमुख महिला सदस्याला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्तीची मागणी वाढली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने सप्टेंबर महिन्यात रेशनकार्ड दुरुस्तीची मुदत दिली होती. मात्र सर्व ऑनलाईन सेंटरवर अतिरिक्त ताण वाढल्याने सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे रेशनकार्ड दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली होती. शिवाय केवळ बेळगाव वन, कर्नाटक वन आणि ग्राम वन कार्यालयात ही सुविधा देण्यात आली आहे. मात्र रेशनकार्ड दुरुस्तीसाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत लाभार्थ्यांचे रेशनकार्ड दुरुस्त होणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी गृहलक्ष्मी, अन्नभाग्यसाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, नाव कमी करणे व जोडणे यासह इतर दुरुस्ती आहे. रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने काही लाभार्थ्यांना गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्यपासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान रेशनकार्ड दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत होती. मात्र दुरुस्तीचे काम सर्वत्र एकाचवेळी सुरू होत असल्याने सर्व्हरडाऊनची समस्या उद्भवू लागली आहे. बेळगाव वन आणि कर्नाटक वनमध्ये दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. रविवारी पहिल्या दिवशी सर्व्हरडाऊनमुळे बहुतांशी लाभार्थ्यांना माघारी परतावे लागले होते. तर सोमवारी दुसऱ्या दिवशीदेखील काहीकाळ सर्व्हरडाऊनचा फटका बसला. मंगळवारी मुदतीचा अंतिम दिवस असल्याने लाभार्थ्यांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या कालावधीत किती लाभार्थ्यांची रेशनकार्ड दुरुस्ती होणार हेच पहावे लागणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांना दुरुस्तीच्या पुढील तारखेची वाट पहावी लागणार आहे.









