कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा
वृत्तसंस्था/ कारगिल
कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बुधवार, 26 जुलै रोजी लडाखमधील द्रास येथील युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्र्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सुपुत्रांना नमन केले. याप्रसंगी त्यांनी शेजारी देशाला कडक संदेश देताना भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर लष्कर नियंत्रण रेषा ओलांडून शत्रूचा नायनाट करेल, असा सज्जड दम त्यांनी भरला.
विजय दिनानिमित्त बुधवारी कारगिलमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला. 1999 मध्येच कारगिलवर विजय मिळवल्यानंतर लष्कराला नियंत्रण रेषा ओलांडता आली असती, परंतु भारताची शांतताप्रिय देशाची विचारधारा विश्वासावर आधारलेली असल्याचे सांगत भारतीय मूल्ये आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या बांधिलकीमुळे हे पाऊल त्यावेळी उचलले गेले नाही, असे स्पष्ट केले. आम्ही त्यावेळी नियंत्रण रेषा ओलांडली नसली तरी गरज पडल्यास केव्हाही एलओसी ओलांडू शकतो, असे ते म्हणाले.
देशवासियांना आश्वासन देताना संरक्षण मंत्री म्हणाले की, देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा सरकारसाठी सर्वश्रेष्ठ आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये काही देशांमधील युद्धाच्या अवाजवी कालावधीचा दाखला देत त्यांनी सैन्याला सहकार्य करण्यासाठी सदैव तयार राहण्यास सांगितले. तसेच आव्हानात्मक प्रसंगात प्रत्येक देशवासियाने आपली भूमिका निभावण्यास तयार राहावे असे सुचविताना प्रत्येक भारतीयाने सैनिकाची भूमिका निभावण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.
कोणतेही युद्ध केवळ सैन्यांमध्येच होत नाही, तर त्या देशांतील लोकांमध्येही युद्ध होत असते. युद्धात केवळ सैन्यच लढत नाही, तर कोणतेही युद्ध हे दोन राष्ट्रांमधील लोकांमध्ये असते. युद्धात सैन्य थेट सहभागी होते, पण अप्रत्यक्षपणे त्या युद्धात शेतकऱ्यांपासून ते डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ आणि इतर अनेक व्यवसायातील लोक सहभागी होत असतात, असेही सिंग यांनी सांगितले.
शूर महिलांचा गौरव
कागरिल विजय दिन सोहळ्यात भारतमातेच्या शूर सुपुत्रांना श्र्रद्धांजली वाहण्यासोबतच संरक्षणमंत्र्यांनी शूर महिलांचा गौरवही केला. तसेच लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही दलांचे प्रमुखही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 1999 मध्ये कारगिलच्या शिखरांवरून पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी दरवषी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
‘संपूर्ण जगाला दिला संदेश’
कारगिलचा विजय हा संपूर्ण भारतातील जनतेचा विजय होता. भारतीय सैन्याने 1999 मध्ये कारगिलच्या शिखरावर जो तिरंगा फडकवला तो केवळ ध्वज नव्हता, तर तो या देशातील कोट्यावधी जनतेचा स्वाभिमान होता. या युद्धाच्या माध्यमातून राष्ट्रीय हितासाठी कोणतीही किंमत मोजताना आमचे सैन्य मागे पडणार नाही, असा संदेश भारताने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दिल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.









