उत्तर कर्नाटकातील 3 कोटीहून अधिक महिलांनी घेतला लाभ : तिकिटांचे मूल्य 81 कोटी
बेळगाव : राज्य सरकारने शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बसप्रवासाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मंगळवार दि. 4 जुलैपर्यंत उत्तर कर्नाटकातील 3 कोटी 15 लाख महिलांनी परिवहन मंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास केला असून या प्रवासाच्या तिकिटाचे मूल्य 80 कोटी 96 लाख रुपयांहून अधिक होते. वायव्य परिवहनचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व नागरिकांचे सहकार्य यामुळे शक्ती योजनेंतर्गत महिलांचा बसप्रवास यशस्वीरीत्या सुरू असून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सुरू केलेल्या या योजनेला उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शक्ती योजनेला सुरुवात होऊन 24 दिवस उलटले. तरीही प्रवास करणाऱ्या महिलांचा उत्साह काही कमी झालेला नाही. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या कार्यक्षेत्रातील धारवाड, बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी, कारवार या सहा जिल्ह्यांतील नऊ विभागात 4 जुलै रोजी एका दिवसात 15 लाख 63 हजार 881 महिलांनी मोफत बसप्रवास केला असून त्या तिकिटांचे मूल्य 3 कोटी 89 लाख 9 हजार 187 इतके झाले आहे. 11 जून रोजी शक्ती योजनेला चालना देण्यात आली. त्या दिवसापासून 4 जुलैपर्यंत 3 कोटी 15 लाख 8 हजार 654 महिलांनी मोफत बसप्रवास केला असून या प्रवासाच्या तिकिटाचे मूल्य 80 कोटी 96 लाख, 51 हजार 876 इतके होते. या योजनेच्या यशस्वीतेसाठी परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता वाढविली असून त्यांचे योगदानही मोठे आहे, अशा शब्दात व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.









