कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
कोल्हापूर चित्रनगरीला पुर्वी कलेची पंढरी म्हणून ओळखले जात होते. चित्रपट आणि मालिकांच्या चित्रिकरणासाठी संपूर्ण चित्रपटनगरी कोल्हापुरात येत होते. परंतू अचानक सर्वच चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण मुंबईत होवू लागले. कोल्हापुरातील कलाकार आणि तंत्रज्ञांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतू कोरोना कालावधीत मात्र देशभर चित्रिकरण बंद असताना कोल्हापुरातील चित्रनगरीत चित्रिकरण सुरू होते. कोरोनानंतर याच मालिका सुविधांची वनवा असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा मुंबईला चित्रिकरणासाठी गेल्या. आता राज्य शासनाकडून चित्रनगरीत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतातरी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते चित्रनगरीकडे वळणार का? असा सवाल स्थानिक कलाकारांकडून विचारला जात आहे
कोल्हापुरातील चित्रनगरीमध्ये प्रत्येक दोन एकरमध्ये निर्माता, दिग्दर्शकाला पाहिजे तसा शुटींगचा सेट उभारण्यास परवानगी दिली जाते. पाटलाचा वाडा, चाळ, वसतिगृह, रेल्वेस्थानक, रस्ते, बंगल्याचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापुरात चित्रनगरी, पंचगंगा नदी, शिवाजी विद्यापीठ, दऱ्या खोऱ्या, पन्हाळा, विशाळगड, राधानगरी, काळम्मावाडी धरणासह चित्रीकरणासाठी केत्येक स्थळे आहेत. अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी अशी धार्मिक स्थळे आहेत.
कलाकार, दिग्दर्शक यांच्या निवासासाठी कोल्हापुरात भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने चित्रीकरणासाठी कोणतीही अडचण येत नाही. तसेच स्थानिक कलाकार आणि दर्जेदार काम करणारे तंत्रज्ञ आहेत. मुंबई–पुण्यापेक्षा कमी खर्चात या सुविधा मिळणार आहेत
चित्रनगरीतील नव्याने देण्यात आलेल्या सुविधा पाहण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक पाहणी करून जात आहेत. पाहणी झाल्यानंतर लोकेशन ठरवण्यात किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी जातो. तोपर्यंत कोल्हापुरातील स्थानिक कलाकारांना चित्रनगरीतील रोजगाराची वाटच पाहावी लागणार आहे. सध्या तुळजाभवानी आणि जुळवी गाठ ग या दोन मालिकांचे चित्रिकरण सुरू असून या मालिकांमध्ये ठराविकच स्थानिक कलाकार काम करतात. इतर कलाकारांना मात्र मिळेल ते काम करून आपला घर–संसार सांभाळावा लागतो आहे.
- चित्रिकरणासाठी किती दिवस वाट पाहणार
चित्रनगरीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्याने निर्माते व दिग्दर्शक सुविधांची पाहणी करीत आहेत. परंतू अद्याप कोणीच कोल्हापूरला येण्यासंदर्भात कळवलेले नाही. त्यामुळे आणखी काही महिने कोल्हापुरातील चित्रकारांना चित्रिकरणासाठी वाटच पाहवी लागणार आहे.








