कोल्हापूर :
महापालिकेला रस्त्यातील खड्डे बुजवायला पावसाळ्यापूर्वी एप्रिल–मे महिन्या मूहूर्त मिळत नाही. रिपरिप पावसात कधी माती मिश्रीत मुरूम तर पावसाची उघडीप असताना डांबरविरहीत खडी टाकून चालुगिरी करण्यात येते. आताही खड्डे बुजवण्यात चालुगिरी केल्याने डांबराचा पत्ताच नसल्याने खडी इतरत्र विस्कटून वाहनधारक घसरुन पडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करुनही रस्त्यांचे दुखणे कायम असल्याने शहरावासीयांतून नाराजी व्यक्त होत आहे.
वादग्रस्त ठरलेला एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील त्रृटी, शासन व महापालिकेच्या निधीतून शहरातील प्रमुख 150 रस्त्यांची निकृष्ट बांधणी, ठेकेदाराकडून मुदतीत रस्त्यांच्या दुरूस्तीकडे झालेले दुर्लक्ष, मुदतीत केलेल्या अनेक रस्त्यांची झालेली चाळण आदीमुळे शहरातील रस्त्यावर खडडयांची मालिका आजही कायम आहे. दरवर्षी किमान चार कोटी रुपयांची तरतुद खड्डे बुजविण्यासाठी करुनही रस्त्यांवरील वाहतुक शहरवासीयांचा पाठीचा मणका ढिला करणारी ठरत आहे. शहरातील प्रमुख रस्ते वरुन चकचकीत दिसत असले तरी अंगर्तत 300 किलोमिटरचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. खराब रस्ते प्रकरणी ठेकेदारांना नोटीस बजावणे हा फक्त एक फार्स ठरल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 40 वर्षात शहरातील रस्त्यांवर दहा पटीने ताण वाढला. मात्र रस्त्यांची क्षमता तशीच राहिली. वाहतुकीचा भार सोसण्याची क्षमता नसलेले रस्ते व दुरवास्थेमुळे पडलेले खड्डे यामुळे शहरातील वाहतूक रेंगाळत आहे. परिणामी गेल्या दहा वर्षात शहरातील हवेत एसओ-2, एनओएक्ससारख्या विषारी घटकांची सहापटीने वाढ झाल्याचे नॅशनल कॉम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटीरिंग (एनएएक्यूएम)च्या अहवाल सांगतो. रेंगाळण्राया वाहतुकीमुळे गोंगाटात भर पडून सरासरी 65 ते 70 डेसीबलवरुन 20 डेसीबलची वाढ झाली आहे. खड्डेयुक्त रस्त्यातील गाळामुळे पाऊसाने उसंत दिल्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुळ वाढली आहे. परिणामी डोळ्यांच्या समस्या वाढल्या वाढल्या आहेत. रेंगाळणारी वाहतुक श्वसनाचे आजार, डोकेदुखी, अस्वस्थता, दम लागणे, डोळे चुरचुरणे, त्वचेचे विकार आदींना निमंत्रण देणारी ठरत आहे.
पेव्हर व हॉटमिक्स पध्दतीने केलेल्या रस्त्यासाठी एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत डागडूजी करण्याची जबादारी ठेकेदाराची असते. मे महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांचे सर्वेक्षण करुन डांबर–खडीचे योग्य मिश्रन घालून रोलींग करुन रस्त्यांची डागडूजी केली जात नाही. पावसाळा नसतानही सध्या माती मिश्रीत मुरूम टाकून पॅचवर्क केले जात असल्यानेच रस्ते खड्ड्यात गेल्याचे वास्तव आहे. मुदतीत खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती जूजबी आहे. यंत्रणेची मिलीभगत असल्यानेच शहरातील रस्त्यांची वाट लागल्याची भावना शहरावासीयांची आहे.
- आयआरबीचे रस्ते बारा वर्षानंतरही सुस्थितीत
अल्पकाळात रस्ते खराब होण्यास जबादार कोण ? महापालिका दरवर्षी किंवा मुदत संपल्यानंतर रस्ते बांधणी करु शकत नाही. रस्त्याला दुसऱ्यांदा डांबर लागण्यास किमान पाच वर्षाचा कालावधी लागतो, असे असताना रस्त्यांची बांधणीचे तंत्र का बदलले जात नाही ? आयआरबीने केलेले डांबरी रस्ते मागील बारा वर्षापासून सुस्थितत आहेत. मग महापालिकेनं केलेले रस्ते एक दिड वर्षात का खड्डेयुक्त होतात ? असा सवाल उपस्थित होत आहे.








