सहकार मंत्र्यांकडे तक्रार करणार : आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची माहिती
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. संचालक मंडळाने कोट्यावधीचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे लेखा परीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम सोसायटीत जमा करण्यासाठी राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठविण्यात येईल, जोपर्यंत गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत सातत्याने याचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
नंदगड मार्केटिंग सोसायटीत अनेक वर्षांपासून गैरव्यवहार होत आहे. ही मालिकाच सुरू आहे. गेल्या दोन-तीनवर्षांच्या लेखा परीक्षण अहवालामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. याबाबत लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी सोसायटीतून कर्मचारी तसेच संचालक मंडळ आणि अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावे आगाऊ रक्कम उचलल्याचे स्पष्ट केले आहे. ही आगाऊ रक्कम जवळपास दोन कोटीच्या घरात आहे. त्यामुळे सोसायटीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. याचा फटका सभासदांना बसलेला आहे. तसेच सोसायटीची प्रगती खुंटलेली आहे. काही संचालकांनी आर्थिक फायदा करून घेतलेला आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या माध्यमातून सिलिंडर एजन्सी किंवा रेशनधान्य पुरवठा, मंगल कार्यालय यासह इतर स्वरुपात आर्थिक व्यवहार करण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटिंग सोसायटी तोट्यात चाललेली आहे.
त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे आणि सभासदांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासूनच्या लेखा परीक्षण अहवालात त्रुटी नोंद करण्यात आल्या आहेत. मात्र याची दखल संबंधित खात्याकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे संचालक मंडळाचे फावलेले आहे. सोसायटीचा एककल्ली कारभार सुरू असल्याने त्याचा फटका सोसायटीनाही बसलेला आहे. मार्केटिंग सोसायटीत चाललेल्या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, यासाठी सहकार मंत्र्यांकडे तसेच राज्य सहकार निबंधकांकडे पुराव्यासह लेखी तक्रार करण्यात येणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात आपण वरिष्ठ सभागृहात याबाबत आवाज उठविणार आहे. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर हे ही विधानसभेत आवाज उठवतील, आम्ही कोणत्याही राजकारणासाठी हा आरोप करत नसून तालुक्यातील एक नामांकित आणि 65 वर्षांचा इतिहास असलेल्या सोसायटीच्या भवितव्याचा विचार करून आम्ही गांभीर्याने दखल घेऊन सहकार मंत्र्यांकडे व विधानसभेत आवाज उठविणार आहोत.
कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार
याबाबत मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर निलजकर यांना विचारले असता आमची संस्था ही 1958 पासून कार्यरत आहे. जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला असता तरी लेखा परीक्षण कार्यालयाकडून केव्हाच कारवाई झाली असती. आताच मार्केटिंग सोसायटीबाबत गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही तालुक्यातील अनेक सहकार क्षेत्रातील अनेक अस्थापनावर आरोप करण्यात आले. आताही नंदगड मार्केटिंग सोसायटीवर राजकीय हेतूने आरोप करण्यात येत आहेत. जर आर्थिक गैरव्यवहार झाला असता तर लेखा परीक्षण करणारे पुन्हा लेखा परीक्षणाची जबाबदारी घेतली असती का, फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गैरव्यवहाराचा आरोप करण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.









