आरटीओ ऑनलाईन व्यवहारात 112.85 टक्के वाढ : वाहन अॅपमधून 95.49 टक्के तर सारथी अॅपमधून 90.28 टक्के कर जमा
दीपक बुवा /बेळगाव
बेळगाव आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार आता ऑनलाईन झाला आहे. त्यामुळे अनेक एजंटांना चाप बसला आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने आता 100 टक्क्यांहून अधिक कर भरणा ऑनलाईन झाल्याची कार्यालयात नोंद झाली आहे. याचबरोबर ‘वाहन’मधून 95 टक्के तर ‘सारथी’मधून 90 टक्के ऑनलाईन कर भरण्यात आला. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उपनोंदणी कार्यालयानंतर सर्वात अधिक महसूल देणारे कार्यालय म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. आरटीओचा कारभार आता ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहे. येथील 100 टक्के व्यवहार ऑनलाईन झाले असून कर भरणारे, परवाना काढणारे वाहनचालक आता ऑनलाईनच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेपरलेस वर्क आरटीओ कार्यालयात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षभरापासून वाहन आणि सारथी अॅपमधून आतापर्यंत 1 अब्ज 60 कोटी 49 लाख 25 हजार 178 रुपये कर ऑनलाईनच्या माध्यमातून मिळाला आहे.
केंद्र सरकारने सर्व व्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातूनच होण्याकडे भर दिला आहे. आता रोख रक्कम किंवा बँकेत जाऊन डीडी काढण्याऐवजी थेट ऑनलाईनच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या वेबसाईटवर अथवा अॅपवर रक्कम जमा होत आहे. वाहन अॅपमधून 1 अब्ज 56 कोटी 64 लाख 69 हजार 641 रुपये तर सारथी अॅपमधून 3 कोटी 84 लाख 55 हजार 537 रुपये ऑनलाईन कर भरण्यात आला आहे. हा कर 2022-23 सालात भरण्यात आला असून एप्रिल ते जुलै 2023 मध्ये वाहन अॅपमधून 51 कोटी 34 लाख 89 हजार 120 रुपये तर सारथी अॅपमधून 1 कोटी 29 लाख 86 हजार 96 रुपये कर जमा करण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयात रोख रकमेऐवजी ऑनलाईनद्वारे थेट सरकारच्या तिजोरीत रक्कम जमा होते. आरटीओ कार्यालयाचा इतिहास ब्रिटिश काळापासून आहे. ब्रिटिश कारभाऱ्यांनी वाहतुकीचे नियम लावण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या कार्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून सर्व देवाण-घेवाण रोकड आणि कागदपत्रांवर चालायची. मात्र, आता हे कार्यालय हळूहळू कात टाकत असून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच व्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. यामुळे कामासाठी तासन्तास ताटकळत थांबणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
एजंटगिरीला काही प्रमाणात चाप
जुनी कागदपत्रे तसेच इतर काही व्यवहार कागदपत्रांवर चालत असले तरी इतर सर्व कारभार किंवा पैशांचे अधिकतर व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे येथील एजंटगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. वाहने जप्त किंवा दंड आकारणी हे सर्व व्यवहार आता ऑनलाईन करण्यात येत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयातही ते ऑनलाईनद्वारेच होत आहेत. आरटीओ कार्यालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या आरटीओ कार्यालयातील कामकाज बीएसएनएलमध्ये हलविण्यात आले आहे. बेळगाव येथील आरटीओ कार्यालय सुमारे 80 वर्षांपूर्वीचे आहे. तेव्हापासूनचा सर्व कारभार कागदपत्रांवरच चालत होता. आता त्यामध्ये बदल झाला असून सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाहन परवान्यासाठी सरकारने वाहन आणि सारथी अॅप सुरू केले आहेत. बेळगाव आरटीओ कार्यालयात या अॅपद्वारे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत.
ऑनलाईनवरच भर
महसूल किंवा शुल्क हे ऑनलाईनद्वारेच केले जात आहेत. आता या कामाला प्रगती देऊन येथील सर्व कारभार ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाहन व सारथी अॅपमुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबली आहे. वाहन परवान्यासाठी लागणाऱ्या रांगा आता कमी झाल्या आहेत.
-नागेश मुडस्, आरटीओ
वाहन व सारथी अॅपमधून 2022-23 सालात ऑनलाईनद्वारे जमा करण्यात आलेला कर ऊपयात…
- महिना वाहन अॅपद्वारे सारथी अॅपद्वारे
- एप्रिल 145568922 3053729
- मे 113925302 3429615
- जून 107936116 3735723
- जुलै 100398602 3821965
- ऑगस्ट 113343532 3285398
- सप्टेंबर 138705130 3641760
- ऑक्टोबर 184821743 2975404
- नोव्हेंबर 128276886 3443479
- डिसेंबर 119495094 3214857
- जानेवारी 126143126 3424896
- फेब्रुवारी 114029230 2386401
- मार्च 173825958 2042310
- एकूण 1566469641 38455537









