वर्कशॉप सांडपाणी प्रकरण भोवले, हरित लवादाचा निर्णय
कोल्हापूर प्रतिनिधी
सुभाष स्टोअर्समधील सांडपाणी प्रकरण कोल्हापूर महापालिकेला भोवले आहे. या प्रकरणी मनपाला 3 कोटींचा भुर्दंड बसला आहे. हरित लवादाच्या गुरूवारी झालेल्या सुनावणीमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
उमा टॉकीज, सुभाष स्टोअर्स येथील वर्कशॉपमध्ये महापालिकेच्या वाहनांची देखभाल-दुरूस्ती केली जाते. एका सामाजिक कायकर्त्याने येथील सांडपाणी प्रकरणी एप्रिल 2022 मध्ये हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. महापालिकेच्या ताफ्यात शेकडो वाहने आहेत. त्यांची देखभाल दुरूस्ती सुभाष स्टोअर्स येथील वर्कशॉपमध्ये होते. या वर्कशॉपमधील वाहने धुतल्यानंतर त्याचे सांडपाणी जयंती नाल्यात जाते. पुढे जयंती नाला पंचगंगा नदीत मिसळतो. त्यातून मोठय़ा प्रमाणात पंचगंगा नदीचे प्रदूषण होत आहे. तसेच सुभाष स्टोअर्स विनापरवाना सुरू आहे, असेही दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यावर राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरू होती. लवादाने महापालिकेमुळे पर्यावरणीय नुकसान किती झाले असेल? याचे मूल्यांकन करण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने 26 ऑगस्ट रोजी 2 कोटी 28 लाख रु. दंडाची नोटीस महापालिकेला पाठविली. याचबरोबर 40 वर्षापासून पर्यावरण परवाना घेतला नसल्याने 80 लाखांचा दंड लावला. दरम्यान, मनपाने 2 कोटींची दंडाची रक्कम कशी आकरणी केली. याचे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविले होते. यावर गुरूवारी हरित लवादासमोर सुनावणी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा युक्तीवाद ग्राहय़ धरत त्यांनी केलेली दंडाची रक्कम योग्य असल्याचे सांगून हरित लवादाने सुमारे 3 कोटी रूपये जमा करण्याचे आदेश मनपाला दिले आहेत.