कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक के. विश्वनाथ यांचे मार्गदर्शन : काकती येथे रयत केंद्रातर्फे कार्यशाळा
वार्ताहर /काकती
मसूर, हरभरा पीक विविधीकरणामुळे उत्पादनात वाढ होऊन आर्थिक नफा, मातीची सुपीकता वाढवून अनेक फायदे होतात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावता येते. येत्या रब्बी हंगामात आमच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार या कडधान्य पिकांची लागवड करावी, असे आवाहन मत्तीकोप येथील कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक के. विश्वनाथ यांनी केले. केएलई कृषी विज्ञान केंद्र मत्तीकोप व बेंगळूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन प्रादेशिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काकती रयत संपर्क केंद्राच्या सभागृहात ‘पीक विविधीकरणावरील पायलट प्रकल्प’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमात आत्म योजनेच्या संयोजिका सविता परीट यांनी स्वागत केले. के. विश्वनाथ म्हणाले, मसूर व हरभरा रब्बी हंगामात 100 ते 120 दिवसात येणारी पिके आहेत. या पिकांसाठी पहिला आठवडा जमीन तयारी, दुसरा आठवडा बियाणे प्रक्रिया करण्यासाठी रायझोबियम व पीएसबी कल्चर लावणे, 9 वा आठवडा फुलोरा, 10 व 12 वा आठवडा शेंगा भरण्याची अवस्था, 14 ते 15 आठवडा पिकांची काढणी नंतर मळणीची कामे अशाप्रकारे प्रत्येक आठवड्यातील नियोजन व व्यवस्थापन वैज्ञानिकदृष्ट्या करणे आवश्यक आहे.
बेंगळूरचे वैज्ञानिक अधिकारी शास्त्रज्ञ डॉ. व्ही. राममूर्ती म्हणाले, भात पिकानंतर रब्बीत कडधान्ये घेतल्यास मातीची सुपीकता टिकते. स्थिर उत्पन्न मिळते. मातीत नायट्रोजन स्थिरीकरण, रायझोबियम जीवाणुमुळे पुढील पिकाला खताची गरज कमी लागून सेंद्रिय रचना सुधारते. रासायनिक खतांचा वापर कमी होतो. जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते. हा पायलट प्रकल्प राबविणे म्हणजे ही मोठ्या योजनेची प्रायोगिक सुरुवात आहे. प्रकल्प राबवून याचे परिणाम, फायदे, मर्यादा व अडचणी तपासल्या जाणार असून या पिकांचा आदर्श नमुना प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन बांधापर्यंत राहणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे किडीबद्दल वैज्ञानिक श्रीनिवास यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सिद्धेश्वर प्रोड्युस कंपनीचे अध्यक्ष गोपीचंद नरेगवी, भाऊराव रुटकुटे, शंकर अष्टेकर, सुरेश गवी यांच्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग उपस्थित होता. अधिकारी अरुण कापशी यांनी प्रास्ताविक केले.









