कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिल्ह्यात 1 ते 23 मे या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट व मान्सूनपूर्व पावसामुळे 95.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये 31 गावांतील 335 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, भात, भुईमूग, भाजीपाला, उडिद आदी पिक बाधित झाले आहे. कृषि विभागाचा हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल आहे. पण मुसळधार स्वरूपाच्या झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कृषि विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार करवीर तालुक्यात कोणत्याही पिकांचे नुकसान झालेले नाही. कागलमधील 2 गावांतील 2 शेतकऱ्यांच्या केळी (20 गुंठे) व आंबा (10 गुंठे) पिकांचे नुकसान झाले आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, चंदगड या तालुक्यात पावसामुळे पिकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा कृषि विभागाचा अंदाज आहे. पन्हाळा तालुक्यातील 4 गावांतील 23 शेतकऱ्यांचे भात (6 हेक्टर), भुईमूग (3 हेक्टर) पिक बाधित झाले आहे. हातकणंगले तालुक्यात 19 गावांतील 52 शेतकऱ्यांचे केळी (10 हेक्टर), भुईमूग (9 हेक्टर), तर उडिद (4 हेक्टर) पिकांना फटका बसला आहे. शिरोळमधील 6 गावातील 258 शेतकऱ्यांच्या 63 हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला पिके कुजली आहेत. अशा प्रकारे जिह्यातील 31 गावांतील 335 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये केळी 10 हेक्टर, आंबा 10 गुंठे, भात 6 हेक्टर, भूईमूग 12 हेक्टर, भाजीपाला 63 हेक्टर, उडिद 4 हेक्टर अशा प्रकारे एकूण 95.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
- ऊस भरणी, खरीप पेरणी रखडली ; उन्हाळी पिक पाण्यात
जिह्यातील एकूण पिकाखाली क्षेत्रापैकी 1 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. म्हणजेच एकूण पिक क्षेत्रापैकी सुमारे 50 टक्क्यांहुन अधिक ऊस पिक आहे. जिह्यातील बहुतांशी शेतकरी ऊस पिकास प्राधान्य देतात. त्यामुळे साखर कारखान्यांनी उभ्या खोडवा, बोडवा ऊस पिकाची तोडणी केल्यानंतर पुन्हा मशागत करून त्यामध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यात ऊस पिकाची लावण केली जाते. हे ऊस पिक मे अखेरीस भरणीस येते. पण यंदा अगदी 10 मे पासूनच पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेकडो हेक्टर ऊस पिकाची भरणी खोळंबली आहे. तसेच खरीप हंगामातील पेरणीसाठी पूर्वमशागत झालेली नाही. सध्या शेतपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याला वाफसा येण्यासाठी सुमारे 15 दिवसांहून अधिक काळ पावसाची उघडीप आवश्यक आहे. तसेच मे महिन्यामध्ये काढणीस आलेली उन्हाळी पिके पाण्यात गेल्यामुळे कुजू लागली आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे उभे ऊस पिक जमिनदोस्त झाले आहे. कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होऊन ऊस तोडणी होण्यासाठी आणखी सहा ते सात महिन्यांचा कालवधी लागणार आहे. तोपर्यंत भुईसपाट झालेले ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
- भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात भाजीपाल्याचे पिक मोठ्या प्रमाणात केले जाते. या दोन तालुक्यात जमिनीची प्रत काळी आहे. त्यामुळे गेले आठ ते दहा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे या जमिनींना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी त्यामधील भाजीपाल्याची पिके कुजली आहेत.
- आठवड्याभरात पिकांचे पंचनामे सुरु करणार
मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस पिकांचे येत्या आठवडाभरात पंचनामे सुरु केले जाणार आहेत. कृषि, महसूल आणि ग्रामपंचायत विभागामार्फत पंचनामे करणार आहे. सध्या कृषि विभागाचा 95.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पिकांचे पंचनामे करताना त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविला जाणार आहे.
–जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर








