शेतकरी आर्थिक संकटात : जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी
बेळगाव : अतिवृष्टीमुळे बेळगाव सीमावर्ती जिल्ह्यात खरीप हंगामात लागवड केलेल्या 65 हजार हेक्टरमधील शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुबार पेरणी केलेल्या पिकांवरही संकट ओढावले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच पिके पुराखाली जाण्यासह नदीला आलेल्या पुरातून वाहून गेली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाप्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
शेजारील महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटात त्याचबरोबर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. महाराष्टातील कोयनासह इतर जलाशये भरली आहेत. त्यामुळे कृष्णा आणि इतर उपनद्या असलेल्या वेदगंगा, दूधगंगा आणि घटप्रभा, मलप्रभा तसेच जिल्ह्यातील इतर नद्या, ओढे आणि तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी काठच्या परिसरातील शेतात नद्यांचे पाणी शिरले आहे. परिणामी खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. शिवाय घटप्रभा व मलप्रभा जलाशये पूर्ण भरली आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशयही भरला आहे.
त्यामुळे यंदा उन्हाळ्यात बेळगावकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही. तथापि, नदीकाठच्या शेतातील पिके पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 146 मि.मी. पाऊस होणे आवश्यक होते पण प्रत्यक्षात 595 मि. मी. पाऊस झाला. 119 मि. मी. जास्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पाऊस झाल्याने कोयना, राजापूरसह इतर जलाशये भरली आहेत. महाराष्ट्रातील जलाशयातून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कृष्णा, मलप्रभा, घटप्रभासह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी नदीकाठच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 55 हजार हेक्टर क्षेत्रातील शेती पिके तर 15 हजार हेक्टर क्षेत्रातील बागायती पिके पाण्याखाली गेली आहेत.
चालू पावसाळ्यात मे आणि जूनमध्ये चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण 7.32 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट्या होते. त्यापैकी 7.25 लाख हेक्टरमध्ये म्हणजेचे 99 टक्के पेरणी झाली आहे. यापैकी 55 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या 10 हजार हेक्टर प्रदेशातील ऊस, 31.970 हेक्टरमधील मूग, 12 हजार हेक्टरमधील चवळी आणि 35 हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 11 हजार हेक्टरमधील भात व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच किडीचाही प्रादुर्भाव झाल्याने बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्यातील शेतकरी बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पिकांवर नांगर फिरवत आहेत.









