देवरुख :
संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात गव्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नासधूस करत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. वनविभागाने गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सायंकाळच्या दरम्यान गव्यांचे दर्शन होत असल्याने येथील ग्रामस्थ एकटे फिरण्यास घाबरत आहेत. मठधामापूर गावातून सप्तलिंगी नदी बारमाही वाहते. त्यामुळे येथील शेतकरी बारमाही विविध पिके घेत असतात. सध्या सुरू असलेल्या हंगामात कलिंगड, कुळीद, पावटा, वांगी व भाजीपाला यांची लागवड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षीपासून ताम्हाने पंचक्रोशीत गव्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी मठधामापूर परिसरात गव्यांनी शेतकऱ्यांना अक्षरश: हैराण केले आहे. शेतात शिरून पिकाची मोठी नासधूस ते करत आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. येथील मंगेश गणेश गुरव याने आपल्या शेतात कलिंगड, वांगी, पावटा व पालेभाजी यांची लागवड केली आहे. यातील कलिंगड पीक चांगले तयार झाले होते. मात्र गव्यांनी याची नासधूस केल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.








