वार्ताहर/हलशी
नंदगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचे कळप ठाण मांडून राहिले आहेत. नंदगडजवळील धरण परिसरातील शेतवडीत हत्तींच्या कळपाने सोमवारी रात्री आणि मंगळवारी भात, ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या सुगीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांनी भात कापून वळी घालून ठेवले होते. भाताच्या वळ्या उद्ध्वस्त करून भाताचे नुकसान केले आहे. यात जोतिबा वांद्रे, सतीश पाटील, रमेश पाटील, सुनील पाटील व अशोक पाटील यांची भातगंजी विस्कटून खाऊन तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच संजय कारलगेकर यांच्या ऊस आणि भात पिकात शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत वनखात्याला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी माधुरी दळवाई यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
जोतिबा वांद्रे यांचे 100 पोती भाताचे नुकसान
जोतिबा वांद्रे यांनी आपल्या शेतातील जवळपास शंभर पोत्यांच्या भात कापून वेगवेगळ्या ठिकाणी वळी लावून रचून ठेवले होते. सोमवारी रात्री जोतिबा वांद्रे यांच्या शेतात हत्तींचा कळप दाखल झाला व हत्तीनी वांद्रे यांच्या शेतातील भात वळी विस्कटून भातावर ताव मारला. तसेच भाताचे प्रचंड नुकसान केले आहे. यात वांद्रे यांचे शंभर पोती भाताचे नुकसान झालेले आहे. तसेच संजय कारलगेकर यांचे 25 पोती भात तसेच ऊसात हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला असून यात जवळपास शंभर टन उसाचे नुकसान कळपाकडून झाले आहे. धरण परिसरात शेती मोठ्याप्रमाणात असल्याने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असल्याने ऊस आणि भात मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. शेतकरी तुकाराम गौडा यांचे सुमारे 25 पोती भात, राजू देसाई, रमेश पाटील, नारायण वांद्रे यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. वनखात्याने हत्तींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सुगीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. भात, ऊस पिकाच्या कामात असतानाच हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.









