पावसाचा मारा-शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने समस्या : तिसऱ्यांदा-चौथ्यांदा पेरणीचे संकट
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये भात पिकाच्या रोप लागवडीवरतीच जोर दिला जातो. रोपाचीच लागवड नंतर केली जाते. सर्रास या भागात भाताची पेरणी कमी प्रमाणात केली जाते. मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांसमोर भात रोप लागवडीचे संकट ओढवले असून रोप लागवडीसाठी भाताच्या बियाणांची केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार तर काही तिसऱ्यांदा भात बियाण्याची पेरणी केली. मात्र मुसळधार पावसामुळे सदर पेरणी केलेल्या शेतजमिनीत पाणी साचल्याने भात बियाणे उगवलीच नाहीत. आता तिसऱ्यांदा व चौथ्यांदा पेरणीचे संकट शेतकऱ्यांवरती आले आहे. मात्र भाताची बियाणे आणावी कोठून, हा मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
भात बियाणे पुन्हा मिळणे कठीण
चालूवर्षीच्या खरीप हंगामाकडे एक नजर टाकली तर मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. अति पावसामुळे शेतीची मशागत करणेही मुश्किल झाले. ज्या भागात जमिनीतील पाणी सुकले अशा भागात शेतकऱ्यांनी भातरोप लागवडीसाठी भाताच्या बियाणांची पेरणी केली. मात्र जून महिन्यात पुन्हा पावसाला जोर झाल्याने सदर पेरलेली भाताची बियाणे उगवलीच नाहीत. पुन्हा शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा भाताच्या बियाणांची पेरणी केली. शेतवडीत पाणी साचल्याने तीही उगवली नाहीत. तर तिसऱ्यांदा भाताच्या बियाणाची पेरणी करूनदेखील भात बियाणे उगवलीच नसल्याने आता चौथ्यांदा भाताच्या बियाणांची पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मात्र हे करत असताना भाताची बियाणे आता आणावीत कोठून, हे संकट सध्या शेतकऱ्यांवर आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जमिनीत ओलावा झाली की भाताच्या बियाणांची पेरणी केली जाते. सदर भाताचे बियाणे उगवल्यानंतर त्या रोपांची लागवड केली जाते. मात्र यावर्षीचे चित्र बदलले आहे. मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे आणि शेतवाडीत पाणी साचल्याने पेरलेल्या भात बियाणांची उगवणच झाली नाही.तर काही ठिकाणी उगवण झाली. मात्र पाणी अधिक भरल्याने तेही कुजून गेले. यामुळे आता भातपिकाचे काय करावे, या गोंधळात शेतकरी वर्ग अडकला आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
कामगार वर्ग मिळणे कठीण
पश्चिम भागामध्ये शेतकरी भात रोप लागवड अधिक प्रमाणात करत असतात. कारण रोप लागवड केल्याने भांगलण, कोळपणी असा बऱ्याच खर्चाची बचत होते. तसेच अलीकडे कामगार वर्ग मिळणेही कठीण झाले आहे. याचा सारासार विचार करून शेतकरी भातरोप लागवडीवरती जोर देत आहे.









