जिल्ह्यात अंदाजे 2 हजार कोटींचा फटका, शेतीबरोबर बागायतीवर परिणाम
बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील भात आणि बागायती शेतीला फटका बसला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेली पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेळगाव, खानापूर वगळता इतर 13 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात 6.38 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र यापैकी 2.50 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. खरीप हंगामात भात, ऊस, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबिन आदी पिकांची पेरणी व लागवड झाली आहे. मात्र पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने अहवाल सादर केला आहे. यंदाच्या हंगामात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यानंतर जुलै अखेरीस समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पेरणी आणि लागवडीची कामे पूर्ण झाली. मात्र त्यानंतर पाऊस गेल्याने काही ठिकाणी पिकांना आलेले अंकुर देखील कोमेजले आहेत. तर काही ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गोकाक, मुडलगी, अथणी, रायबाग, कागवाड, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल यासह इतर तालुक्यांतील पिकांना फटका बसला आहे. तर काही भागात पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पन्न होणाऱ्या क्षेत्रात यंदा केवळ 50 किलोच उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीसाठी काढलेले कर्ज देखील फिटणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ऊस पिकांचे नुकसान
जिल्ह्यात 2.95 लाख हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. त्यापैकी 1.10 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा सरासरी उत्पन्न एकरी 20 टन कमी होणार आहे. नदी, नाले आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणेही अशक्य होवू लागले आहे. ऊस उत्पादनात घट होणार असल्याचे साखर उत्पादनावर याचा परिणाम जाणवणार आहे. पावसाअभावी यंदा 30 टक्के पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच एकूण उत्पादनात घट होणार आहे. परिणामी भुईमूग, सोयाबिन, भात, मका आदींच्या दरात वाढ होण्याची चिंता व्यक्त होवू लागली आहे.
अहवाल शासनाकडे
यंदाच्या हंगामात 13 तालुक्यांमध्ये सुमारे 2.50 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बेळगाव, खानापूर तालुक्यांमध्ये विशेष सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
– शिवनगौडा पाटील-सहसंचालक कृषी खाते









