गोधोळी-लिंगनमठ भागातील पिके पाण्याअभावी सुकली, ऊस लावणीत व्यत्यय
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्याच्या आग्नेय भागातील गोधोळी, तावरकट्टी, लिंगनमठ भागातील गावांसाठी व शेतवडीसाठी बिडीऐवजी अळणावर येथून विद्युतपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी व्यवस्थित विद्युतपुरवठा होत होता. गेल्या आठ दिवसापासून विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. परिणामी ऐन ऊस लावणीच्या हंगामात शेतात पाणी सोडण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे दिवसा बारा तास थ्री फेज विद्युतपुरवठा व रात्री बारा तास सिंगलफेज विद्युतपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
खानापूर तालुक्याच्या तावरकट्टी, गोधोळी, गुंडोळी, बाळगुंद, गोदगेरी, पूर, लिंगनमठ, चुंचवाड या गावांच्या शेतवडीसाठी गतवर्षी बिडी विद्युत केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येत होता. बिडीपासून सदरचे अंतर खूप दूर असल्याने पुरेसा विद्युतपुरवठा होत नसल्याने बोअरवेल चालत नव्हत्या. या भागातील गावांना अळणावर येथील विद्युतपुरवठा केंद्राजवळ असल्याने अळणावर केंद्रातून विद्युतपुरवठा करावा म्हणून या भागातील जनतेने खासदार विश्वेश्वर हेगडे यांना विनंती केली होती. खासदारांच्या सूचनेनुसारकाही महिन्यापासून अळणावर केंद्रातून विद्युतपुरवठा करण्यात येत होता.
वीज पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने बोअरवेलही बंद
पण गेल्या काही दिवसापासून या विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने बोअरवेल बंद झाल्याने शेती पिकांना पाणी देणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे पिके सुकून गेली आहेत. पाण्याअभावी ऊस लावणी करण्यात काही शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. वरील भागातील गावांच्या काही अंतरावर जंगल आहे. जंगली प्राणी रात्री शेतवडीत तर काही वेळा गावात येतात. या जंगली प्राण्यांमुळे जनतेला धोका संभवतो. त्यासाठी विद्युत दिव्यांची आवश्यकता आहे. विद्युत पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अंधारातच शेताकडे जावे लागते.
आयबॉक्सही ठरणार कुचकामी
काही शेतकऱ्यांनी शेतातील आपल्या पिकांच्या सुरक्षिततेसाठी आयबॉक्स बसवले आहेत.आयबॉक्ससाठी विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने आता जंगली प्राणी शेती पिकात घुसणार असल्याने आयबॉक्सही कुचकामी होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. या भागातील जनता आता वैतागली असून विद्युत खात्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बेळगाव व मॅनेजिंग डायरेक्टर हुबळी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. संबंधित समस्येवर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.









