खरीप पिके-आंबा, काजू फळांवर धूळ-धुराचा परिणाम : शेती व्यवसायच संकटात : शासनाने परवानगी न देण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
सुळगा(हिं.) ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कल्लेहोळ गावच्या परिसरात अनेक खडीमशींनी असून अलीकडच्या काळात काही नवीन खडीमशीनना आणखी जादा परवानगी दिल्याने या खडीमशीनची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे माळजमिनीतील येणाऱ्या खरीप हंगामातील सर्व पिकांवरती तसेच आंबा, काजू या फळावरतीसुद्धा या खडीमशीनीतून निघणारा धूळ आणि धूर यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेती व्यवसायच मोडकळीस येण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे. शेती व्यवसायच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सुळगा ग्रामपंचायतने खडीमशीनना परवानगी देऊ नये, अशी जोरदार मागणी कल्लेहोळ परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी केली आहे.
कल्लेहोळ गावालगतच्या बेळगुंदी-राकसकोप रोडलगत अनेक खडीमशीनचा पसारा मोठ्या प्रमाणात आहे. या माळजमिनीतच या खडीमशीनी विखुरलेल्या असून, याच परिसरात पावसाळी खरीप हंगामात बटाटा, भाजीपाला, रताळी, भुईमूग, सूर्यफूल अशी विविध प्रकारची पिके घेतली जातात. सातत्याने या खडीमशीनीतून उडणारी धूळ या पिकांवरती जाऊन बसत असल्याने या पिकांची सातत्याने वाढ खुंटते आणि हातातोंडाशी येणारी सर्व पिके खराब होत जातात. यामुळे शेतकऱ्यांना शेतवडीत पिकांची लागवड करूनदेखील मोठे नुकसान सोसावे लागते. हे दरवर्षीच या शेतकऱ्यांना सहन करावे लागत असल्याने शेती ओस पडण्याच्या मार्गावर आहे.
शेतकऱ्यांनी आता या जमिनीत काय करावे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तसेच याच माळजमिनीत अनेक शेतकऱ्यांच्या आंबा-काजूच्या बागा आहेत. उन्हाळ्यामध्ये या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते आणि नेमके या मोहरावरती या धुळीचा दुष्परिणाम होऊन मोहोर खराब होत जातो. तसेच काही झाडांना आंबा, काजू लागल्यानंतर रोजच्या या धुळीच्या माऱ्यामुळे सदर पिकेही खराब होतात. यामुळे या भागातील संपूर्ण बागायतदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका दरवर्षी सहन करावा लागत आहे. या भागात खडीमशीनच्या प्रचंड आवाजामुळे माळजमिनीत काम करणेही शेतकरीवर्गाला मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही मोठा धोका या परिसरात आहे. संपूर्ण वातावरण हे धूळमय झालेले असते. या खडीमशीनमधील धूळ श्वासोच्छ्वासावाटे शरीरात जात असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका सातत्याने होत असतो. याचा परिणाम आरोग्यावरती होऊन अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. याचा विचार कोण करणार, असा संतापजनक प्रश्न शेतकरी वर्ग आणि या भागातील तमाम नागरिकांतून विचारला जात आहे.
सुळगा ग्रा. पं.ने कारवाई करण्याची गरज
या भागात अलीकडच्याच काळात काही नवीन खडीमशीनना परवानगी देण्यात आली आहे. सुळगा ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणारा हा परिसर असून सुळगा ग्रामपंचायतने अशा खडीमशीनना परवानगी देण्याअगोदर त्या भागातील जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर परवानगी देणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायत या शेतकऱ्यांची विचारपूस न करता म्हणणे न ऐकताच परवानगी दिली जाते. आणि याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने यावर उपाययोजना करून या खडीमशीन्स बंद कराव्यात आणि लोकांच्या आरोग्याला आणि शेतातील पिकांना होणारा नुकसानीचा फटका थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









