महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचे आश्वासन : उत्तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांत 7.24 लाख हेक्टरवर पीकहानी
बेंगळूर : पुरामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्या खात्यात लवकरात लवकर भरपाई जमा केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिले. उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकातील जिल्ह्यांत सरकारने केलेल्या पीक नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षण आणि भरपाईच्या तपशीलांबाबत बुधवारी कृष्णभैरेगौडा यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. तसेच आतापर्यंत राज्य सरकारने जाहीर झालेल्या भरपाईची माहिती दिली. 2025 च्या नैर्त्रुत्य मान्सून हंगामात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुसळधार पावसामुळे शेती आणि बागायती पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. सुमारे 5.29 लाख हेक्टर क्षेत्रातील शेती आणि बागायती पिकांचे नुकसान झाले होते.
ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले होते तेथे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करून आणि पीक नुकसान भरपाई देण्याची तयारी राज्य सरकारने केली होती. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि महाराष्ट्रातील जलाशयांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उत्तर कर्नाटकात भीमा नदी खोऱ्यातील भागात पूर आला. परिणामी या भागातील कलबुर्गी, यादगिरी, बिदर आणि विजापूर या चार जिल्ह्यांत सुमारे 7.24 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिली. चार जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीचे पुन्हा संयुक्त सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असून पीक नुकसानीच्या क्षेत्राच्या आकडेवारीत बदल करण्यात येईल. हे संयुक्त सर्वेक्षण 10 दिवसांत पूर्ण केले जाईल. एकंदर 2025 च्या नैर्त्रुत्य मान्सूनमध्ये सुमारे 12.54 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे, असे ते म्हणाले.
पहिल्या टप्प्यातील भरपाई वितरण प्रक्रिया सुरू
याआधी पीकहानीचे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झालेल्या 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 5.29 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. राज्य सरकारने प्रति हेक्टर 8,500 रुपये अतिरिक्त भरपाई जाहीर केली आहे. पावसावर आधारित पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 17,000 रु. भरपाई व सिंचनयुक्त जमिनीवरील पिकांच्या नुकसानीसाठी 25,500 रु. आणि दीर्घकालीन पिकांच्या नुकसानीसाठी 31,000 रु. भरपाई दिली जाणार आहे. भरपाईची रक्कम काही दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी सांगितले.









