पपई उत्पादक संकटात,20 हेक्टर जमिनीतील केळी पिकाचे नुकसान, भरपाईची सरकारकडे मागणी
बेळगाव : मान्सूनच्या पावसाला सुरुवात होताच पावसावर अवलंबून असलेल्या पिकांना पाऊस उपयोगी ठरला. मात्र तत्पूर्वी झालेल्या सोसाट्याचा वारा आणि वळीव पावसामुळे जिल्ह्यात केळी उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळीबरोबरच पपई पिकालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात जलसिंचनाचे प्रमाण अधिक असल्याने बागायती पिके त्याचबरोबर भाजीपाला घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. यावर्षी बागायती पिके व भाजीपाला उत्पादन चांगले येणार, शेतकऱ्यांना लाभाचे ठरणार असा कयास केलेल्या शेतकऱ्यांना वारा आणि पावसाने शॉक दिला आहे. यावर्षी मान्सून पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे केळी पिकाला फटका बसला. लाखो रुपये खर्च करून केळीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पपई पिकाची परिस्थिती हीच आहे. 20 हेक्टर जमिनीतील केळी पिकाला नुकसान पोहोचले आहे. याशिवाय कांदा, दोडका, कारले, बिन्स व टोमॅटो पिकांचेही नुकसान झाले आहे. भाज्यांना फटका बसल्यामुळे बाजारपेठेत भाज्या महागल्या आहेत. कांदा, टोमॅटो, दोडका, बिटरुट, भेंडी, वांगी, बटाटा यांचे दर सध्या तेजीत आहेत. अधिक मागणी व बाजारपेठेत पुरवठा कमी यामुळे ग्राहकांना चढ्या दरात भाजी खरेदी करावी लागत आहे.
एकूण 33.81 हेक्टर जमिनीतील पिकांची हानी
वारा-पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे बागायत व महसूल खात्याकडून संयुक्तपणे पाहणी करून भरपाईसाठी सरकारला अहवाल देण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार 22.26 हेक्टर जमिनीतील केळी, 2.15 हेक्टर जमिनीतील पपई व कांदा, कारले, दोडका, बिन्स, टोमॅटो यासह एकूण 33.81 हेक्टर जमिनीतील पिकांची हानी झाली आहे. उत्पादकांचे सुमारे 47.27 लाख रुपयांचे नुकसान झाले असून एनडीआरफनुसार भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना 5.76 लाख रुपये भरपाई मिळणे शक्य आहे.
30 हून अधिक ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त
वारा-पावसामुळे झाडे, फांद्या, विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून आतापर्यंत 250 हून अधिक विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. 30 हून अधिक विद्युत परावर्तक (ट्रान्स्फॉर्मर) नादुरुस्त झाले आहेत.









