सांगली :
कृष्णा नदीवरील पूरस्थिती ओसरल्यानंतर आता नदीकाठच्या परिसरात मगरींचे दर्शन होऊ लागले आहे. सांगलीवाडी व कर्नाळ परिसरात काही शेतकऱ्यांनी नदीकिनारी व शेताजवळ मगरी फिरताना पाहिल्या आहेत. या शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये टिपलेला थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पूराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील झुडपे, लहान ओढे व मगरींचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. पाणी ओसरल्यानंतर अधिवास गमावलेल्या मगरी आता शेतमळ्यात आणि नदीकिनारी भटकताना दिसत आहेत
सांगलीत दरवर्षी पूरस्थिती उद्भवते. मात्र नदी ओसरल्यानंतर एवढ्या संख्येने मगरी नागरिकांना दिसल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडिओंमध्ये मोठ्या आकाराच्या मगरी स्पष्ट दिसत आहे.
या परिस्थितीची दखल घेत वनविभाग व प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठी व बंधाऱ्यांवर अनावश्यक वावर टाळा, मगरींना छेडू नका. त्यांच्या हालचाली दिसल्यास वन विभागास लगेच माहिती द्या असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.








