नागरिकांत भीती, वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
पलूस :
शहरातील शिवाजीनगर परिसरात पुन्हा एकदा मगरीचा वावर दिसून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेषतः अंगणवाडी शाळेजवळ मगरीचा वावर दिसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काल (दि. १९ ऑगस्ट) रात्री ओढ्यातून एक मगर बाहेर येऊन रस्त्यावर फिरताना दिसली. कृष्णा नदीपासून सुमारे ७-८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपनगरात मगरीचा वावर झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पूर्वी याच परिसरातील एका शेततळ्यात सापडलेली मगर वन विभागाने पकडून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडली होती. मात्र, आता पुन्हा मगर दिसल्याने वन विभागाकडून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रस्त्यालगत वाढलेली झाडे-झुडपे काढून टाकावीत आणि परिसरात नियमित साफसफाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाकडून या भागाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.








