कराड :
कराडच्या प्रीतिसंगमानजीक कृष्णा व कोयना नदीच्या पात्रात दोन महिन्यांपासून वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण असताना सोमवारी पुन्हा प्रीतिसंगमानजीक कोयना नदीपात्रात पूर्ण वाढ झालेल्या महाकाय मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे विषेशत: कोयना नदीकाठचे रहिवासी व गोटे गावच्या शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे.
येथील प्रीतिसंगम परिसरात कोयना नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील नदीकाठावर सोमवारी मगरीचे दर्शन झाले. सोमवारी सकाळी प्राणीमित्र सुरेश पवार यांनी ड्रोनच्या साह्याने केलेल्या चित्रीकरणामध्ये ही मगर नदीच्या पाण्यात तरंगत विश्रांती घेत असल्याचे स्पष्ट दृश्य टिपले गेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील जुना व नवीन पूल, तसेच कोयनेश्वर मंदिर आणि प्रीतिसंगम परिसरात वारंवार मगरीच्या होणाऱ्या दर्शनाने नदीत पोहायला येणाऱ्या नागरिकांसह मासेमारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रीतिसंगमाला दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. मात्र, नदीत मगरीचे वास्तव्य असल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या मगरीला पकडून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, मगरीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी नदीत उतरणे, पोहणे, मासेमारी करणे टाळावे, तसेच वन विभाग आणि पालिका प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, तसे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.








