उपनगराध्यक्षा दीपाली सावळ यांचा पलटवार : आम्ही वैयक्तिक बाबी बाहेर काढल्या तर तोंड दाखवणे कठीण होईल
मडगाव : न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर हे वैफल्यग्रस्त झाले असल्याने वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत आहेत. जर आम्ही त्यांच्या वैयक्तिक बाबी बाहेर काढल्या, तर त्यांना लोकांना तोंड दाखविणे कठीण होईल, असा पलटवार मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ यांनी केला आहे. न्यू मार्केटमध्ये आजोबा, पणजोबांपासून व्यापाराची परंपरा चालू असल्याचे म्हणणाऱ्या शिरोडकर यांनी हे मार्केट मारवाडी आणि अन्य परप्रांतीयांनी कसे व्यापले ते लोकांना सांगावे. यापूर्वी मार्केट समितीचे सदस्य असलेले नगरसेवक महेश आमोणकर यांनी एक मारवाडी दुकानचालक बेकायदा दुरुस्तीकाम करत असल्याचे प्रकरण उजेडात आणले होते. त्यावेळी सदर मारवाडी व्यक्तीने विनोद शिरोडकर यांनी काम करण्यास सांगितले असल्याचे सांगितले होते. मार्केट पालिकेच्या मालकीचे असून व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना दुकानाची दुरुस्ती करण्यास सांगण्याचे अधिकार कोणी दिले आहेत, असा सवाल उपनगराध्यक्षा सावळ यांनी केला.
मुख्याधिकाऱ्यांना घेऊन मार्केट समितीने सदर बेकायदा दुरुस्तीकामाची पाहणी केली होती. तेथे तैनात सुरक्षा रक्षकांना रात्रीच्या वेळी कोणतीही बेकायदा कामे होत असल्यास मार्केट समितीच्या अध्यक्ष या नात्याने आपल्या नजरेस आणून द्यावे, असे निर्देश दिले होते त्यानुसार गेल्या शुक्रवारी सुरक्षा रक्षकांनी, मार्केट निरिक्षक सांतो फर्नांडिस यांनी रात्री 11 पर्यंत मार्केट सुरू ठेवण्यास मुभा दिली असल्याचे माझ्या नजरेस आणून दिले. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी तसे निर्देश दिले होते. पावसाळी मोसम असल्याने विक्रीचे साहित्य मार्केटमध्ये नेऊन व्यवस्थित मांडण्यासाठी ही मुदतवाढ दिली असल्याने मी त्याचे स्वागतच केले होते. कारण कित्येक बाजारकर आमच्या परिचयाचे आहेत, असे स्पष्टीकरण सावळ यांनी दिले. विनोद शिरोडकर यांना पूर्वीप्रमाणे आपली मनमानी करून बाजारात गैरकृत्ये करण्यास मिळत नसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेचे स्वत:ला अध्यक्ष म्हणवत असले, तरी त्यांचे पद शाबूत आहे की नाही याबद्दल सर्वांना साशंकता आहे. कारण मागील कित्येक वर्षे या संघटनेची निवडणूक झालेली नाही, असा दावा उपनगराध्यक्षा सावळ यांनी केला.









