वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याकरीता विदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीय फुटबॉलपटूंची निवड करण्याच्या दिशेने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे प्रयत्न सुरू असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी सांगितले.
राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विदेशात असणाऱ्या भारतीय वंशाच्या 24 फुटबॉलपटूंची निवड करण्याच्या हेतूने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय फुटबॉल संघाला इगोर स्टिमॅक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. भारतीय फुटबॉल संघाची निवड करण्याकरीता भारतीय वंशाच्या फुटबॉलपटूची गरज असल्याचे मत प्रशिक्षक स्टिमॅक यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. या विषयावर बराच कालावधी परिसंवाद घेतला जात असे. भारतीय कायद्यानुसार संघातील खेळाडूला दुहेरी नागरिकत्वाचा आधार घेता येणार नाही. भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 12 महिने वास्तव्य असणे गरजेचे आहे. अलिकडच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी समाधानकारक होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. 12 जानेवारीपासून कतार येथे सुरू होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ निवड प्रक्रिया सुरू आहे. कुवेतमध्ये अलिकडेच झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरी स्पर्धेतील सामन्यात भारताने कुवेतचा पराभव केला होता. गेल्या 22 वर्षांच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने पहिल्यांदाच विश्वकरंडक पात्र फेरी स्पर्धेतील सामना जिंकला आहे.









