कोणत्याही बँकेत बदलून मिळणे बंधनकारक : टाळाटाळ करणाऱ्या बँकेविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मुभा
मनीषा सुभेदार /बेळगाव
जीर्ण झालेल्या, फाटलेल्या, जळालेल्या, पाण्यात पडलेल्या, तेल लागलेल्या नोटा बदलायच्या कोठे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडतो. एक काळ असा होता की, बेळगावमध्ये काही ठरावीक दुकानांमध्ये ‘येथे फाटक्या नोटा बदलून मिळतील’ असा फलक टांगलेला दिसत असे. तो दुकानदार या नोटा कोठून बदलून आणत असावा, नोटा बदलण्याचे निकष काय? असे प्रश्न तेव्हाही अनेकांना पडले असतील. नोटबंदीनंतर नोटा बदलून देण्याचे प्रमाण वाढत राहिले. मात्र, आज जीर्ण आणि फाटक्या नोटा कोठे बदलून मिळतील? याची फारशी माहिती जनतेला नाही किंवा त्याबद्दल जनजागृतीही करण्यात आलेली नाही. फार थोड्या जणांना शिवाय बँकेत काम करणाऱ्यांना नोटा बदल करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती आहे. कोणत्याही बँकेमध्ये जीर्ण आणि फाटक्या नोटा बदलून देणे, हे बँकेसाठी बंधनकारक आहे. याची आजही अनेकांना जाण नाही. अनेक लोकांशी बोलल्यानंतर हे वास्तव सामोरे आले आहे. बँकेमधून नोटा बदलून देण्याची प्रक्रिया तसे पाहिल्यास अत्यंत सुटसुटीत व सोपी आहे. फक्त त्यासाठी नोटेचे स्वरुप नेमके काय आहे? हे जाणून घेणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणतीही बँक नोट बदलून देण्यासाठी टाळाटाळ करू शकत नाही. अनेकदा बऱ्याच बँका जेव्हा अशी टाळाटाळ करतात, तेव्हा ग्राहकांना त्या बँकेविरुद्ध तक्रारही दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
नोटा कशा बदलून मिळतील?
- जीर्ण नोटा : अशा नोटांचे दोन प्रकार केले जातात. एक म्हणजे जुनी, मळकट किंवा किंचित फाटलेली नोट. अशा नोटेवर दोन्ही बाजूंचे नंबर सुस्थितीत असतील तर ती नोट बदलून मिळते. मात्र, नंबर आहे आणि नोट मध्ये फाटली असेल तर ती जुनी नोटच समजली जाते. तिला ‘कट नोट’ समजले जात नाही.
- कट नोट : कोणत्याही सार्वजनिक बँकांमध्ये या नोटा बदलून मिळतात. कट नोट म्हणजे एखाद्या नोटेचे चार-पाच तुकडे झाले असतील तरी ती बदलून मिळते. समजा, त्या नोटेवरील महत्त्वाचा मजकूर म्हणजे ‘इश्युईंग अथॉरिटी’ (अदाकर्ता), अशोक स्तंभ किंवा महात्माजींचे छायाचित्र जरी कोठे चुकून फाटले असेल तरीसुद्धा ती नोट बदलून मिळते. याशिवाय त्या नोटेवर वॉटरमार्क मात्र दिसायला हवा. तो नसेल तर अन्य वरील संदर्भ त्या नोटेत स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.
- करन्सी चेस्ट : आपल्याला फक्त बँकेतच नोटा बदलून मिळतील, असे नाही. प्रत्येक बँकांचे स्वतंत्र असे करन्सी चेस्ट असते. त्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते. सदर करन्सी चेस्ट सर्व जुन्या, जीर्ण, फाटक्या नोटा एकत्रित करून त्या आरबीआयला पाठवतात. या ठिकाणीसुद्धा नोटा बदलून मिळू शकतात.
आपल्याला बँकेमध्ये खात्यावर काही रक्कम भरावयाची असेल आणि त्यावेळी चुकून आपल्याकडे जीर्ण फाटकी नोट असेल, बँकेच्या नियमानुसार त्यावरील आकडे आणि चिन्हे सुस्थितीत असतील तर अशा नोटा स्वीकारणे बँकेसाठी बंधनकारक आहे. मात्र, ग्राहकाला नोटा देताना कोणत्याही परिस्थितीत बँकेने जुन्या, जीर्ण, फाटक्या नोटा देऊ नयेत, असा नियम आहे. म्हणूनच एटीएममध्ये आपल्याला अशा नोटा कधीही उपलब्ध होत नाहीत. नोटेचा 20 टक्के भाग खराब असेल व 80 टक्के भाग सुरक्षित असेल तर पूर्ण रक्कम मिळू शकते. जर 40 ते 80 टक्क्यांपेक्षा अधिक खराब असेल फक्त निम्मे मूल्य मिळू शकते. दोन भिन्न नोटांचे तुकडे असतील तर मोठ्या तुकड्याचे मूल्य विचारात घेतले जाईल. सर्व बँकांनी ग्राहकांना नियमानुसार नोटा बदलून देणे बंधनकारक आहे. जर एखाद्या बँकेने त्यासाठी नकार दिला तर सर्वसामान्य माणसासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कस्टमर केअर क्रमांक 14440 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. तेथे ग्राहकाला माहिती विचारता येईल. तसेच तक्रारींसाठी 160017 हा क्रमांक दिला आहे.
नोटा बदलण्याची मर्यादा किती?
एक ग्राहक 20 नोटा एका वेळेला बदलू शकतो. मात्र, त्या 20 नोटांची किंमत 5 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावी. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा नोटा बदलू शकतो. एका दिवशी एकाच वेळी बदललेल्या नोटांसाठी कोणताही फॉर्म भरणे आवश्यक नाही. मात्र जर जीर्ण, फाटक्या बदलून घेण्याच्या नोटा मोठ्या प्रमाणात असतील म्हणजेच दहा हजार किंवा 20 हजाराच्या पटीत असतील तर बँक त्यावर सेवाशुल्क आकारते.
नोटांचे मूल्यांकन :
- नोट मध्ये फाटली आहे आणि एकच नंबर अस्तित्वात आहे आणि दुसरा नंबर फाटला गेला आहे, अशा वेळी बँक 50 टक्के रक्कम परत करते. कारण याच अर्ध्या नोटेचा दुसरा भाग ज्या कोणाकडे असेल आणि त्याने जर ती नोट बदलून घेतली तर उरलेली 50 टक्के रक्कम त्याला दिली जाते.
- नोटेवरील आकड्यातील फक्त दोनच नंबर शिल्लक राहिले तरीसुद्धा अर्धी रक्कम मिळू शकते. मात्र, तेलात बुडालेल्या, धुतलेल्या नोटा कोणत्याही परिस्थितीत कोणतीही बँक बदलून देऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे तेलकट नोटांना वाळवी किंवा कीड लागू शकते आणि अशी नोट अन्य नोटांना खराब करू शकते. धुतलेल्या नोटांची पावडर होऊ शकते. म्हणून या नोटा बँकांमध्ये स्वीकारल्या जात नाहीत.









