कंग्राळी बुद्रक : कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरामध्ये दुबार भात रोपलागवडीचे संकट ओढवले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी मार्कंडेय नदीला आलेला पूर गेले पाच-सहा दिवस ओसरत नसल्यामुळे मार्कंडेय नदीकाठ शिवार भात रोप लागवड केलेल्या शेतकरी वर्गाला दुबार रोप लागवड करावी लागणार की काय? या चिंतेखाली असल्याचे दिसून येत आहे. तर ज्या शेतकरी वर्गाने मार्कंडेय नदीकाठ शिवारामध्ये रोप लागवड केलेली नाही ते आनंदी आहेत. कारण भात रोप लागवड केलेल्या शेतकरी वर्गाला भात कुजल्यानंतर परत पॉवर ट्रिल्लरने चिखल करावा लागणार. भात रोपाची जुळणी करावी लागणार. यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
ऊस पीक जोमात
कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरामध्ये शेतकरी वर्गाने ऊस लागवडीकडेही कमालीचे लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. सध्या साखर कारखान्याकडून उसाची उचल वेळेत होत असून कारखानदारांकडून चांगला दरही मिळू लागला आहे. यावर्षी मे-जून पासूनच दमदार पाऊस झाल्यामुळे ऊस पिकाची वाढ जोमात झाल्याचे दिसून येत आहे.









