मडुरा पंचक्रोशीत दोन तास बरसला ; बळीराजाची धाकधुक वाढली, भातकापणी खोळंबली
न्हावेली / वार्ताहर
आठवडाभरापासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. ऐन भातकापणीच्या हंगामातच पावसाने एन्ट्री केल्याने शेतकऱ्याची तारांबळच उडाली. अतिवृष्टीतून वाचलेले भातपिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ दिसून आली. सातार्डा, आरोस, न्हावेली, कोंडुरा, पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, शेर्ले, बांदा भागात सोमवारी संध्याकाळी अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी भात कापणी केलेले पिक गोळा करताना शेतकऱ्याची तारांबळ उडाली. मात्र, पाऊस जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांना हातातील कोयती त्याच ठिकाणी ठेवून घर गाठावे लागले. परिणामी भातकापणी मात्र खोळंबली. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे न्हावेली-रेवटेवाडी येथील शेतकरी सुनील परब यांनी सांगितले.
शेतकऱ्यासमोर दुहेरी संकट
शेतातील कापणीयोग्य पिकलेल्या भाताची पावसाच्या भितीने उशिरा कापणी केल्यास लोंब गळून नुकसान होणार आहे. दुसरीकडे कापणी वेळेवर केल्यास भातपीक परतीच्या पावसात भिजून नुकसान होणार. दोन्हीकडून शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यास निसर्गाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित, असे शेतकऱ्यांनी सांगितले.









