सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; उसतोड कामगारांना 15 ऑगस्टपर्यंत ओळखपत्र; तृतीयपंथींना घरकुलासह मिळणार विशेष सुविधा कीट; अट्रोसिटी बाबत अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत निराधारांसाठीच्या वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नागरिक समिती, उसतोड कामगार मंडळ व तृतीयपंथी कल्याण व हक्क मंडळ यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रेखावर यांनी संबंधित गरजूंना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार तात्काळ मदत व सहाय्य देण्यासाठी उपाययोजना राबवा अशा सूचना दिल्या. यावेळी बैठकिला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, डॉ.सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकिस्तक, सी.पी. आर. कोल्हापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच जेष्ठ नागरिक, आमंत्रित सदस्य उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित जेष्ठ नागरिक समिती सदस्यांनी त्यांना येत असलेला अडचणी, समस्या मांडल्या. यावेळी सीपीआर मधील सेवा घेताना जेष्ठ नागरिक, महिला तसेच तृतीयपंथी यांना अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी आता त्यांना रांगेत उभे न राहता प्रत्यक्ष खिडकीतून केस पेपर काढता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी संबंधित विभागास तातडीने सूचना केल्या आहेत. तसेच जेष्ठ नागरिकांबद्दल अद्यायावत माहिती तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांच्या मार्फत एक फॉर्म भरुन गोळा करण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाचा सर्व विभागांना जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना, सेवा याबाबत कृती आराखडा सादर करणाच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत उपस्थितांना दिल्या.
जिल्ह्यात 48 हजार 500 च्या जवळपास ऊसतोड कामगार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत ऊसतोड कामगार येतात. त्यांना आवश्यक सोयी सुविधा तसेच ओळखपत्र देण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, सर्व कामगारांना 15 ऑगस्ट पूर्वी ओळखपत्र देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या शाळांमध्ये गरजेनूसार ऊसतोड कामागारांच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. ऊसतोड कामगारांबरोबर असलेल्या जनावरांचे हंगामापूर्वी लसीकरण करण्याची मोहिमही पशूसंवर्धन विभागाने तातडीने हाती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तृतीयपंथींबाबतच्या आढावा बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील नोंदणी व घरकूलासाठी अर्ज सादर केलेल्यांसाठी तातडीने घरकुले पुरविण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. तृतीयपंथींसाठी रोजगारासह त्यांना आवश्यक सुविधा कीट पुरविण्यासाठी काय करता येईल याबाबत समितीने पर्याय सादर करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले.
तसेच अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील ॲट्रॉसिटी पिडीताना काही अडचणी समस्या असतील तर त्यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य यांच्याशी थेट संपर्क करून मदत घ्यावी असे निर्देश व प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची पोलीस विभागामार्फत तत्काळ चौकशी करावी असे निर्देश सदर बैठकीमध्ये मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी दिले सदर बैठक आज दिनांक 20 जुलै 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांचे दालनामध्ये पार पडली









