शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्याचा केला होता प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
सह्याद्रीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत एपीएमसी पोलिसांनी 27 जणांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात गोवले होते. त्यामुळे हा गुन्हा रद्दबातल ठरविण्यात यावा, याबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाद मागण्यात आली होती. यावर न्यायालयात सुनावणी होऊन एकाच इसमावर दोन गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे, असा निर्वाळा देत दोन प्रकरणातील 54 जणांवरील गुन्हा रद्द केला आहे.
अजित जाधव, सोहन जाधव, सूरज मोदगेकर, सचिन मोदगेकर, संजय किल्लेकर, चंद्रकांत कोंडुसकर, सनातन काशन्नावर, विश्वनाथ कांचन, अमित ढापळे, श्रीप्रसाद जाधव, उमेश पाटील, श्रीधर अळवाणी, सुनील बुलबुले, विनायक बाळेकुंद्री, चेतन कालीमनी, उदय काकतकर, मोहन बळगलीकर, शिवरायाप्पा तारिहाळ, शंकर अळवाणी, प्रवीण देवगेकर, प्रकाश वांगेकर, प्रवीण मोरे, मारुती जाधव, अमित बरवाले, कुलदीप बेळगुंदकर, भूषण कालीमनी, शशिकांत जाधव अशी गुन्ह्यातून वगळण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
वरील सर्वजण 28 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10.30 वाजता सह्याद्रीनगर शेवटचा बसस्टॉप येथील लक्ष्मी मंदिरनजीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जमले होते. या काळात कोरोनामुळे सरकारने काही नियम व अटी घातल्या होत्या. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी रितसर परवानगी देखील घेण्यात आली नव्हती. ही माहिती समजताच एपीएमसीचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी सरकारी कामात अडथळा आणणे व इतर कारणे दाखवत पोलिसांनी एकूण 27 जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आला होता. मात्र, हे गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी याचिका अॅड. राम घोरपडे यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केली होती. दोन्ही प्रकरणात एकाच आरोपीवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेले दोन्ही गुन्हे रद्दबातल केले आहेत.









